MNS : युतीची चर्चा नाही मग भेट कशासाठी? मंत्री उदय सामंतांच्या भेटीनंतर संदीप देशपांडेंनी सांगितलं कारण अन्..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मनसे नेते संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर हे शिवसेनेचे मंत्री उदय सामंतांच्या भेटीला दाखल झालेत आणि एकच चर्चांना उधाण आलं.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांची मुंबईतील वांद्रयाच्या ताज लँड एन्ड हॉटेलमध्ये जवळपास तासभर बैठक झाली. या दोन्ही बड्या नेत्यांमध्ये बैठक होत नाही तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दोन बडे नेते संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांच्या भेटीसाठी पोहोचल्याचे पाहायला मिळाले. संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर हे उदय सामंत यांच्या भेटीसाठी का पोहोचले असावे याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना मंत्री उदय सामंत यांची भेट घेतल्यानंतर संदीप देशपांडे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आणि होणाऱ्या चर्चांना पूर्णविराम दिल्याचे पाहायला मिळाले.
युतीच्या चर्चेसाठी भेट घेतली नाही, असं सुरूवातीलाच सांगून संदीप देशपांडे यांनी चर्चांना ब्रेक दिला. ‘आज युतीसंदर्भात कोणतीही चर्चा नव्हती. पनवेल येथील फुलबाजाराविषयी एक पत्र होतं ते मंत्री उदय सामंत यांना दिलं. माझ्यासारखा लहान कार्यकर्ता युतीच्या चर्चांवर बोलत नाही. वरिष्ठ नेते यावर बोलतात.’, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं.
