Sanjay Raut : झटपट जागा पदरात… भाजपा कार्यालयाच्या भूमीपूजनाआधीच राऊतांचा लेटर बॉम्ब, केलेल्या आरोपांनी खळबळ!
भाजपच्या प्रदेश मुख्यालयाच्या भूखंड खरेदीवरून संजय राऊत यांनी अमित शाहांना पत्र लिहून सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे उदय सामंत यांनी म्हटले आहे. भाजप कार्यकर्त्यांसाठी कार्यालये उभारते, तर राऊत स्वतःसाठी पंचतारांकित बंगले बांधत असल्याचा प्रतिटोला सामंत यांनी लगावला.
भाजपच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयासाठीच्या भूखंड खरेदीवरून सध्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना पत्र लिहून भाजपने पालिकेच्या निवासी भूखंडाचा गैरवापर करत ही जागा घाईघाईने मिळवल्याचा आरोप केला आहे. चर्चगेट स्टेशन परिसरातील बीएमसीची जागा सत्तेचा गैरवापर करून मिळवण्यात आल्याचे राऊत यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
राऊत यांच्या पत्रानुसार, मरिन लाईन्स भूभाग क्रमांक ९ येथील ही मालमत्ता महापालिकेची असून १ हजार ३७७ चौ.मी. जागेपैकी ५४% हिस्सा वासनी कुटुंबीयांकडे होता. ही जागा ११ फेब्रुवारी १९०२ ते १२ फेब्रुवारी २००१ या ९९ वर्षांसाठी भाडेपट्ट्यावर देण्यात आली होती. वासनी कुटुंबीयांनी ४६% भूभागाचे हक्क पालिकेच्या पूर्वपरवानगीशिवाय वेगवेगळ्या बँकांकडे तारण ठेवले होते. मुंबई महापालिकेत भाजपने बाहुले म्हणून बसवलेल्या प्रशासकांच्या माध्यमातून या जागेचे व्यवहार राफेलच्या वेगाने पूर्ण करण्यात आल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. कधी चोवीस तासात, तर कधी तासाभरात सर्व अडथळे दूर करून ही जागा भाजपला देण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुंबई महापालिकेत गेल्या साडेतीन वर्षांपासून प्रशासक असल्याने त्यांच्या माध्यमातून हा व्यवहार ‘करून घेण्यात’ आला, असे राऊत यांनी पत्रात नमूद केले.
