Sanjay Raut : त्यांचे विचार हेच देशासाठी शुभसंकेत आहेत; राऊतांचा मोदींना खोचक टोला
Sanjay Raut On PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीवर खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदा सप्टेंबरमध्ये 75 वर्षांचे होत असल्याने त्यांच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात 75 वर्षे पूर्ण झाल्यावर थांबावे लागते असे विधान केले होते. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तिखट प्रतिक्रिया देत पंतप्रधान मोदींच्या निवृत्तीचे संकेत देशासाठी शुभ असल्याचा खोचक टोला लगावला.
पत्रकार परिषदेत बोलताना राऊत यांना मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या निवृत्तीविषयी विचारले असता, त्यांनी सांगितले, सप्टेंबरमध्ये नरेंद्र मोदी 75 वर्षांचे होत आहेत. त्यांची दाढी पिकली, केस उडाले, जगभर भटकंती झाली, आणि सत्तेची सर्व सुखे त्यांनी उपभोगली. आता आरएसएसच्या नियमांनुसार आणि त्यांनी स्वतः घालून दिलेल्या नियमांप्रमाणे त्यांना निवृत्त व्हावे लागेल आणि देश सुरक्षित हातात सोपवावा लागेल.
राऊत यांनी पुढे म्हटले की, आता मोदी स्वतः 75 वर्षांचे होत आहेत. आरएसएसकडून त्यांना वारंवार निवृत्तीचे संकेत मिळत आहेत. अमित शहा यांनी निवृत्तीनंतर काय करायचे, हा त्यांचा प्रश्न आहे. निवृत्तीनंतर अनेक चांगली कामे करता येतात, जसे नानाजी देशमुख यांनी सामाजिक कार्य केले. अनेकजण आपापल्या भागात सामाजिक कार्यात योगदान देतात. यावर चर्चा करण्याची गरज नाही. पण मोदी आणि शहा यांच्या मनात निवृत्तीचे विचार येणे हे देशासाठी शुभ आहे, असे राऊत यांनी खोचकपणे म्हटले.
