Sanjay Raut : बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले, ‘…तर 90 टक्के मंत्रिमंडळ खाली होईल’
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी महायुती सरकारचं पहिलं मंत्रिमंडळ विस्तार देखील नागपुरातच झालं. यावेळी महायुतीतील एकूण ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र अद्याप कोणतंही खातेवाटप झालेलं नाही. यामुद्द्यावरूनच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची टीका
आजपासून विधानसभेचं हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू झाले आहेत. या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी महायुती सरकारचं पहिलं मंत्रिमंडळ विस्तार देखील नागपुरातच झालं. यावेळी महायुतीतील एकूण ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र अद्याप कोणतंही खातेवाटप झालेलं नाही. यामुद्द्यावरूनच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी टीका करत हे बिनखात्याचं सरकार असल्याचे म्हणत निशाणा साधला आहे. तर महायुतीच्या काल झालेल्या मंत्रिमंडळातील विस्तारामध्ये अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले मंत्री असल्याचे अप्रत्यपणे सूचवत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांच्या गुन्हेगारीसंदर्भात झिरो टॉलरन्स भूमिका असल्याच्या विधानावरुन खोचक टोला लगावला आहे. झिरो टॉलरन्सचा विषय फडणवीस यांनी राज्यात राबवला तर ९० टक्के मंत्रिमंडळ खाली होईल, असं म्हणत संजय राऊत यांनी सडकून टीका केली. दरम्यान, महायुतीच्या मंत्रिमंडळात सुधीर मुनगंटीवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, दीपक केसरकर यांच्यासारख्या बड्या नेत्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आलाय. यावरून संजय राऊतांनी टोला लगावत महायुती सरकारवर सडकून टीका केली. जे आमच्याकडून सोडून गेले ते सत्ता, पद आणि पैसा या मोहासाठी गेलेत. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे, अकार्यक्षमतेचे आरोप होते अशा अनेकांना वगळण्यात आले आहे. छगन भुजबळ यांना वगळण्यामागे जातीय राजकारण असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला.
