Sanjay Shirsat : पक्ष मजबूतीसाठी अशा युत्या कराव्या लागतात, ठाकरे-फडणवीस भेटीवर शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया
Sanjay Shirsat News : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या भेटी नंतर मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली असून उबाठा गटावर टीका केली आहे.
उबाठा गटाची भूमिका नेमकी काय आहे अजून कुणाला कळत नाही. ते उद्या कोणत्या पक्षासोबत जातील हे सांगता येत नाही, असं संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी म्हंटलं आहे. ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू असतानाच आज राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या झालेल्या भेटीने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या गेल्या आहेत. त्यावर बोलताना राज ठाकरेंना आम्ही आधी देखील ऑफर दिली होती. पक्षाची मजबूती वाढवण्यासाठी अशा युती कराव्या लागतात असंही शिरसाट यांनी म्हंटलं आहे.
पुढे बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, ठाकरे गटाची भूमिका गोंधळलेली आहे. यामागचे कारण आहे की, शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा त्यांच्यासोबत नाही, काँग्रेस त्यांना विचारायला तयार नाही, मग ही लढाई कशी लढायची हा त्यांचासमोर प्रश्न निर्माण झाला आहे, अशी टीका देखील शिरसाट यांनी केली आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये जे उबाठाचे आंदोलन सुरू आहे, तो पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. मला वाटते शेतकऱ्यांशी त्यांचे तसे काही देणं घेणं नाही, पण चांगली जनजागृती करत आहे, असा टोला मंत्री संजय शिरसाट यांनी लगावला आहे.
