Sharad Pawar : मतभेद विसरून आपल्याला एक व्हावं लागेल , सत्याचा मोर्चात शरद पवारांचे आवाहन

Sharad Pawar : मतभेद विसरून आपल्याला एक व्हावं लागेल , सत्याचा मोर्चात शरद पवारांचे आवाहन

| Updated on: Nov 01, 2025 | 4:15 PM

शरद पवार यांनी सत्याचा मोर्चाची तुलना महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आणि मुंबईतील मराठी माणसाच्या हक्कांसाठी झालेल्या संघर्षाशी केली. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या योगदानाला उजाळा दिला. महाराष्ट्राची अस्मिता आणि उद्योगधंदे धोक्यात असल्याने, राजकीय मतभेद विसरून एकजूट होण्याची गरज असल्याचे आवाहन पवार यांनी केले.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सत्याचा मोर्चात महाराष्ट्रासमोरील सद्यस्थितीवर चिंता व्यक्त केली आणि राजकीय मतभेद बाजूला ठेवून राज्याच्या हितासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. “राजकीय मतभेद विसरुन आपल्याला एक व्हावं लागेल,” असे ते म्हणाले. हा मोर्चा आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासातील काही महत्त्वाच्या संघर्षांची आठवण करून देत असल्याचे त्यांनी नमूद केले.

१९७८-७९ मध्ये शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचे राज्य स्थापन करण्याच्या एकजुटीचा त्यांनी उल्लेख केला. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेतृत्वाखाली झालेल्या संघर्षातून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र साकारला. यानंतरही मुंबईतील मराठी भूमिपुत्रांच्या रोजीरोटी, उद्योगधंद्यांच्या सुरक्षेसाठी संघर्ष करावा लागला, तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हितासाठी लढा दिला, असे पवार यांनी सांगितले.

आजही महाराष्ट्राच्या अस्मितेवर आणि स्वाभिमानावर हल्ला होत आहे. राज्यातील उद्योगधंदे बाहेर घालवले जात आहेत, असा आरोप त्यांनी केला. देशात एक प्रकारची हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न सुरू असून, या परिस्थितीत महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येणे महत्त्वाचे आहे, असे आवाहन शरद पवार यांनी केले.

Published on: Nov 01, 2025 04:15 PM