Shiv Bhojan Thali : मविआच्या शिवभोजन थाळीला महायुतीचा सहयोग नाही? सहा महिन्यांपासून अनुदान रखडलं
Shiv Bhojan Thali Funding : राज्यातले शिवभोजन थाळी केंद्र हे अनुदानाअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.
राज्यातल्या गरिबांना 10 रुपयांत जेवण मिळावं यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेल्या शिवभोजन थाळीची महायुतीच्या कळत दैना होत असल्याचं बघायला मिळत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून या शिवभोजन थाळीचं अनुदान मिळालेलं नसल्याने राज्यातील शिवभोजन थाळीची अनेक केंद्र बंद झाली आहेत.
नागपूरमधील इंदिरा महिला बचत गटाकडून चालवलं जाणारं शिवभोजन थाळी केंद्र देखील अनुदान मिळालं नाही तर बंद होण्याच्या मार्गावर आहे. शिवभोजन योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी केंद्र चालकांना दर १५ दिवसांनी अनुदान वितरित करण्याची तरतूद आहे. परंतु, गेल्या 6 महिन्यांपासून राज्यातल्या अनेक शिवभोजन थाळी केंद्रांना हे अनुदान मिळालेलंच नाही. त्यामुळे बरीच केंद्र आता बंद झालेली आहेत. एकीकडे कोणतीही योजना सरकारने बंद केलेली नसल्याचं महायुती सरकारकडून ठामपणे सांगण्यात येत असतानाच दुसरीकडे मविआच्या काळात सुरू करण्यात आलेल्या शिवभोजन थाळी सारख्या योजना अनुदानाअभावी बंद होण्याच्या मार्गावर असल्याचं दिसून येत आहे.
