संतोष देशमुख आणि महादेव मुंडे हत्याकांड: सुप्रिया सुळेंचे गृहमंत्रालयावर गंभीर आरोप
लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयावर संतोष देशमुख आणि महादेव मुंडे यांच्या हत्यांच्या प्रकरणी कारवाई न करण्याचा गंभीर आरोप केला. त्यांनी बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर चिंता व्यक्त केली आणि या दोन्ही कुटुंबांना न्याय मिळावा आणि या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली. सुळे यांनी या प्रकरणात गृहमंत्रालयाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी लोकसभेत महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयावर गंभीर आरोप केले. त्यांनी संतोष देशमुख आणि महादेव मुंडे यांच्या क्रूर हत्यांचा उल्लेख करत, या प्रकरणांवर गृहमंत्रालयाने कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप केला.
लोकसभेत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, बीड हा महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचा आणि सुसंस्कृत जिल्हा आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत बीडचे मोठे योगदान आहे. याच जिल्ह्यातील भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली होती. पण दुर्दैवाने, गेल्या एक-दोन वर्षांत बीडमध्ये माणुसकीला काळिमा फासणाऱ्या अनेक घटना घडल्या असल्याचं म्हणत, त्यांनी पुढे सांगितले की, संतोष देशमुख आणि महादेव मुंडे यांच्या अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या झाल्या. सर्वच राजकीय पक्षांनी या घटनांचा निषेध केला आणि त्या अयोग्य असल्याचे मान्य केले. पण महाराष्ट्राचे गृहमंत्रालय या प्रकरणांवर कोणतीही कारवाई करत नाही. संतोष देशमुख आणि महादेव मुंडे यांच्यासह अशा अनेक क्रूर हत्यांच्या घटना बीडमध्ये घडल्या, पण त्यांच्या कुटुंबांना न्याय मिळत नाही.
सुळे यांनी नमूद केले की, देशमुख आणि मुंडे कुटुंबातील लोक न्याय मागण्यासाठी सर्वत्र भटकत आहेत. ते आमदार आणि खासदारांना भेटत आहेत. मी स्वतः त्यांची भेट घेतली आहे. आम्ही माणुसकीच्या नात्याने त्यांच्यासोबत ठामपणे उभे आहोत. पण महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देण्यात अपयशी ठरत आहे. त्यामुळे या दोन्ही कुटुंबांना न्याय मिळावा आणि या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी मी गृहमंत्रालयाकडे करते.
