गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
बारामतीत बोलताना सुप्रिया सुळे यांनी उद्योगपती गौतम अदानी यांना मोठे भाऊ संबोधत अजित पवारांवर उपरोधिक टीका केली. यावर पलटवार करत अजित पवारांनी, मोठे झाल्यावर काही लोक टीका करतात असे म्हटले. सुप्रिया सुळे यांनी अदानींसोबत ३० वर्षांचे प्रेम आणि विश्वासाचे नाते असल्याचे सांगितले.
बारामती येथील एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी उद्योगपती गौतम अदानी यांना आपले मोठे भाऊ संबोधून एक राजकीय विधान केले. त्यांनी म्हटले की, “मला काही गोड कडू बातमी सांगावी वाटली, तर मी भाऊ म्हणून हक्कानं गौतमभाईला सांगते.” या विधानाद्वारे त्यांनी अजित पवारांवर उपरोधिक टीका केल्याचे बोलले जात आहे.
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, गौतम अदानी आणि प्रीती भाभी हे त्यांच्यासाठी मोठे भाऊ आणि वहिनींसारखे आहेत. त्यांच्या कुटुंबासोबत ३० वर्षांपासून प्रेमाचे आणि विश्वासाचे नाते आहे. “कधी आयुष्यात चांगली किंवा गोड बातमी किंवा कडू ही बातमी ही हक्काने कुठल्या भावाला सांगते तर मी या भावाला सांगते,” असे त्यांनी नमूद केले. गौतम अदानींनी केवळ भारतातच नव्हे, तर जगात यश मिळवल्याचा त्यांना सार्थ अभिमान असल्याचेही सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
यावर प्रतिक्रिया देताना अजित पवारांनी म्हटले की, “लोकं मोठं झाल्यानंतर बरेच जण काही ना काही बोलायला लागतात. काही टीका-टिप्पणी करतात, सगळ्या गोष्टी आरोप होत असतात. ते सहन करावे लागतात.” त्यांनी पुढे सांगितले की, स्वतःचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून पुढे वाटचाल करणे महत्त्वाचे असते. या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन चर्चांना सुरुवात झाली आहे.