Supriya Sule Tweet : राज्याला भिकारी म्हणून त्यांनी..; सुप्रिया सुळेंची कोकाटेंवर टीका
सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर टीका केली आहे.
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात मोबाइलवर ‘रमी’ खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला, ज्यामुळे विरोधकांनी कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही कोकाटे यांच्या कृतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत राजीनामा मागितला आहे. सुळे म्हणाल्या, कोकाटे यांनी राज्याला भिकारी म्हणून अपमानाचा कळस गाठला आहे.
हा व्हिडीओ सभागृहात लक्षवेधी मांडली जात असताना समोर आला. यावर स्पष्टीकरण देताना कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, मी रमी खेळत नव्हतो, मला रमी खेळताच येत नाही. हा व्हिडीओ चुकीच्या पद्धतीने पसरवला गेला आहे. त्यांनी पुढे जाहीर केले की, जर या प्रकरणात ते दोषी आढळले, तर ते स्वतः राज्यपालांकडे जाऊन मंत्रिपदाचा राजीनामा देतील. या वादामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
