Thackeray Brothers : बाळासाहेबांना अभिवादन… 11 वर्षांनी ठाकरे बंधू स्मृतिस्थळावर, उद्यापासून जागा वाटप!
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनानिमित्त राज ठाकरे 11 वर्षांनी शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळावर दाखल झाले. उद्धव ठाकरेही उपस्थित होते. या भेटीनंतर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे यांच्या शिवसेनेची आणि मनसेची जागावाटपाची बोलणी उद्यापासून सुरू होणार आहेत. या राजकीय घडामोडींमुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे आणि पुतणे राज ठाकरे दादर येथील शिवाजी पार्कातील स्मृतिस्थळी एकत्र आले. विशेष म्हणजे, राज ठाकरे 11 वर्षांनी बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर उपस्थित राहिले. उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र आदित्य ठाकरे यांनी अभिवादन केल्यानंतर काही वेळातच राज ठाकरे यांनीही पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. त्यानंतर दोघे बंधू काही काळ एकत्र बसले. या भेटीच्या राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चा आहेत.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यात जागावाटपाच्या प्राथमिक बोलणीला उद्यापासून सुरुवात होणार आहे. बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर उद्धव ठाकरे यांनी मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्याशी याबाबत विचारणा केली असता, नांदगावकर यांनी उद्यापासून बोलणी सुरू करण्याचे संकेत दिले. ठाकरे बंधूंचे हे एकत्र येणे कार्यकर्त्यांसाठी सुखावणारे ठरले आहे. काँग्रेसने मुंबईत स्वबळावर लढण्याची घोषणा केल्याने ठाकरे बंधूंसाठी संभाव्य आघाडीचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे.
