School Nutrition Scam : शालेय पोषण आहारात 1800 कोटींचा घोटाळा? ठाकरे गटाच्या आमदाराच्या गंभीर आरोपानं खळबळ
ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी शालेय पोषण आहारात 1800 कोटींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. निविदेतील अटीनुसार 134 रुपये किलोचे हिरवे वाटाणे देण्याऐवजी 30 रुपये किलोचे पांढरे वाटाणे पुरवले जात असल्याचा दावा पाटील यांनी केला. या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी त्यांनी केली आहे.
महाराष्ट्र राज्यातील शालेय पोषण आहारात तब्बल 1800 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी केला आहे. निविदा प्रक्रियेत 134 रुपये प्रति किलो दराने हिरवे वाटाणे पुरवण्याची अट असताना, प्रत्यक्षात शाळांमध्ये 30 रुपये प्रति किलो दराने पांढरे वाटाणे दिले जात असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. हा घोटाळा राज्यभरातील शाळांमध्ये खुलेआम सुरू असल्याचा त्यांचा दावा आहे. आमदार कैलास पाटील यांनी दाखवलेल्या कागदपत्रांनुसार, पोषण आहार योजनेअंतर्गत धान्यादी वस्तूंचे दर निश्चित करण्यात आले होते, ज्यात हिरव्या वाटाण्याचा दर 134 रुपये प्रति किलो होता. मात्र, कमी दराचा पांढरा वाटाणा पुरवून बिले मात्र 134 रुपयांप्रमाणे काढली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. हा भ्रष्टाचार लहान मुलांच्या आहारातून पैसे काढून निवडणुकीत वापरला जात असल्याचेही पाटील यांनी म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
