Uddhav Thackeray : काँग्रेस प्रवेशापूर्वी उद्धव ठाकरे यांचा प्रशांत जगताप यांना थेट फोन, ‘त्या’ 9 मिनिटांत काय झालं बोलणं?
उद्धव ठाकरे यांनी प्रशांत जगताप यांना रात्री उशिरा फोन करून नऊ मिनिटे चर्चा केली. राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या जगताप यांना ठाकरे यांनी आपल्या पक्षात येण्याची खुली ऑफर दिली, तसेच भाजपसोबत युती करणार नसल्याचे स्पष्ट केले. काँग्रेस प्रवेशाची चर्चा असताना, ठाकरे यांच्या फोनमुळे जगताप यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत जगताप यांच्याशी काल रात्री उशिरा दूरध्वनीवरून संवाद साधला. या दोघांमध्ये नऊ मिनिटे चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रशांत जगताप आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू असतानाच ठाकरे यांच्या या फोनमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्र येण्यामुळे प्रशांत जगताप नाराज होते. अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी केल्याने, महानगरपालिका निवडणुकीत पुन्हा त्यांच्यासोबत जाणे त्यांना योग्य वाटत नव्हते. याच कारणामुळे त्यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहराध्यक्षपदाचा आणि पक्षाचा राजीनामा दिला होता. या घडामोडीनंतर त्यांच्यासमोर काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट असे दोन पर्याय होते. उद्धव ठाकरे यांनी जगताप यांना थेट आपल्या पक्षात येण्याची ऑफर दिली असून, योग्य सन्मान राखण्याचे आश्वासनही दिले आहे. तसेच, आम्ही कधीही भाजपसोबत जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
