बाळासाहेबांवरून फडणवीस आणि ठाकरेंमध्ये जुंपली!
देवेंद्र फडणवीसांच्या जन्मभूमीवरील वक्तव्याला उद्धव ठाकरेंनी सडेतोड उत्तर दिले आहे. मुंबई ही कर्मभूमी असल्याचे सांगत ठाकरेंनी फडणवीसांना मुंबईच्या विकासावरून आणि बीएमसीच्या ठेवींच्या हिशोबावरून आव्हान दिले. त्यांनी हिंदू-मुस्लिम वादाऐवजी विकासावर बोलण्याचे आवाहनही केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये विकासावरून उद्धव ठाकरेंना आव्हान दिले होते, तसेच “मुंबईत जन्माला आल्याशिवाय मुंबईकरांना काय पाहिजे हे कळणार नाही” असे वक्तव्य केले होते. याला उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मही पुण्यात झाल्याचे नमूद करत फडणवीसांवर पलटवार केला. मुंबई ही आपली कर्मभूमी असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या ठेवींचा मुद्दाही उपस्थित केला. फडणवीस यांनी ७० हजार कोटींच्या ठेवींचा उल्लेख केला असताना, ठाकरे यांनी ९२ हजार कोटींच्या ठेवी होत्या, मग २२ हजार कोटी गेले कुठे असा सवाल केला. विकासावर बोलण्याऐवजी भाजप हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. मुस्लिम मतांच्या मुद्द्यावर काँग्रेस स्वतंत्र निर्णय घेण्यास मोकळी असल्याचेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.