वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी (VBA) आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने युतीची घोषणा केली आहे. या युतीनुसार वंचित बहुजन आघाडी ६२ जागांवर निवडणूक लढवणार आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले असून, महाराष्ट्राच्या राजकारणात एक नव्या पर्वाची सुरुवात मानली जात आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी (VBA) आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्यात अधिकृतपणे युतीची घोषणा करण्यात आली आहे. या युतीअंतर्गत वंचित बहुजन आघाडी मुंबईतील ६२ जागांवर निवडणूक लढवणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुणकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांच्यासह दोन्ही पक्षांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. पुणकर यांनी सांगितले की, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर आणि पक्षाच्या राज्य कार्यकारिणीने या युतीला मान्यता दिली आहे. भाजपला राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात रोखण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे ते म्हणाले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बाळासाहेब आंबेडकरांशी सकारात्मक संपर्क साधल्याने ही युती प्रत्यक्षात आल्याचे डॉ. पुणकर यांनी नमूद केले. या नव्या राजकीय समीकरणाचे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
