Santosh Deshmukh Case : हत्येचे विदारक फोटो पाहून तरुणाचं धक्कादायक कृत्य, धनंजय देशमुखांनी घेतली कुटुंबाची भेट
Dhananjay Deshmukh In Kaij : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात समोर आलेले अमानुष मारहाणीचे फोटो पाहून केज तालुक्यात एका तरुणाने टोकाचं पाऊल उचलत स्वत:चं जीवन संपवलं आहे. या घटनेची माहिती मिळताच आज धनंजय देशमुख यांनी या कुटुंबाची भेट घेतली.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रातले विदारक फोटो 3 तारखेला सोधल मीडियावर व्हायरल झाले. हे फोटो आणि व्हिडिओ पाहून प्रत्येकजण हळहळला. मात्र हे फोटो बघून विचलित झालेल्या एका 23 वर्षीय तरुणाने टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवल्याची घटना बीडच्या केजमध्ये घडली आहे. या तरुणाच्या घरी जात धनंजय देशमुख यांनी आज कुटुंबाची भेट घेतली.
केज तालुक्यातील जानेगाव येथील अशोक हरिभाऊ शिंदे या तरुणाने सोशल मीडियावर व्हायरल झालेले संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो पाहिले. त्यानंतर तो अस्वस्थ होता. बीडमध्ये आरोपींच्या फाशीच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनात देखील अशोक सहभागी झाला. त्यानंतर बीड बंद मध्ये देखील तो सहभागी झाला. त्यानंतर त्याने गळफास घेत आपले जीवन संपवले. या घटनेची माहिती मिळताच आज संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी शिंदे कुटुंबाला भेट देऊन सांत्वन केलं. आपल्याला सोबत राहून लढायचं आहे. आरोपींना फाशीची शिक्षा होणार नाही, तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही. अशोकने जे केलं ते या पुढे कोणीही करू नका, तुम्ही माझ्यासोबत राहून लढा, असं यावेळी बोलताना धनंजय देशमुख यांनी म्हंटलं आहे.
