आधी 80 रुपयांची चोरी, नंतर खंडणी अन् काही क्षणात थेट चाकूहल्ला…कल्याणमध्ये नेमकं चाललंय काय? CCTV समोर

| Updated on: Oct 23, 2025 | 9:05 AM

कल्याणमधील बिर्ला कॉलेज रोडवर ५० रुपयांच्या खंडणीसाठी गॅरेज मालक राजेश जोशी यांच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला झाला. महात्मा फुले पोलीस चौकीजवळ भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे.

कल्याण पश्चिम भागातील बिर्ला कॉलेज रोड आणि इंदिरानगर परिसरात सराईत गुन्हेगार आणि नशेखोरांनी प्रचंड दहशत माजवली आहे. त्यातच आता काल दुपारी कल्याणमध्ये धक्कादायक घटना घडली. जे. आर. गॅरेजचे मालक राजेश जोशी यांच्यावर केवळ ५० रुपयांची खंडणी न दिल्यामुळे चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना महात्मा फुले पोलीस चौकीच्या अगदी हाकेच्या अंतरावर घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?

राजेश जोशी हे काल दुपारी आपल्या दुकानावर बसले होते. त्याचवेळी विक्की अफगड, दत्ता जाधव, सिद्धेश उर्फ भोप्या आणि त्यांचे इतर तीन साथीदार अशा सहा जणांची टोळी दुकानात आली. या टोळीने दुकानातील एका व्यक्तीच्या खिशात हात घालून ८० रुपये काढले. त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. हा सर्व प्रकार पाहून राजेश जोशी यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.

राजेश जोशी यांनी हस्तक्षेप केल्यामुळे नशेखोरांचा संताप वाढला आणि त्यांनी थेट राजेश जोशी यांच्याकडे खंडणीची मागणी केली. राजेश जोशी यांनी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. या नकाराने चिडलेल्या आरोपींनी कोणताही विचार न करता तात्काळ चाकू काढून राजेश जोशी यांच्यावर वार केले. या जीवघेण्या हल्ल्यात राजेश जोशी गंभीर जखमी होऊन खाली कोसळले. यानंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन मध्यस्थी केल्यानंतर आरोपी पळून गेले. यानंतर जखमी राजेश जोशी यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.

पोलिसांना थेट आव्हान

एमपीडीएतून सुटलेला गुन्हेगार पुन्हा सक्रिय या हल्ल्यातील मुख्य आरोपींपैकी एक असलेला दत्ता जाधव हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी पोलिसांनी MPDA (Maharashtra Prevention of Dangerous Activities) कायद्यांतर्गत कारवाई केली होती. या कायद्याखाली तो दीड वर्ष तुरुंगात राहून महिनाभरापूर्वीच बाहेर आला होता. तुरुंगातून बाहेर येताच त्याने पुन्हा बिर्ला कॉलेज रोड परिसरात खंडणी गोळा करणे, चाकूचा धाक दाखवणे आणि दहशत माजवण्याचे कृत्य सुरू केले होते. पोलिसांना थेट आव्हान महात्मा फुले पोलीस चौकीच्या इतक्या जवळ, भरदिवसा सराईत गुन्हेगारांनी खंडणीसाठी चाकू हल्ला करण्याची हिंमत दाखवल्याने, त्यांनी पोलिसांना जणू थेट आव्हानच दिले आहे. यामुळे परिसरातील व्यापारी वर्गात आणि नागरिकांमध्ये मोठी भीती पसरली आहे. खंडणी न दिल्यास जीवघेणा हल्ला होऊ शकतो, या भीतीने नागरिक धास्तावले आहेत.

याप्रकरणी राजेश जोशी यांच्या तक्रारीवरून कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत सिद्धेश उर्फ भोप्या नावाच्या आरोपीला ताब्यात घेतले आहे. मात्र, मुख्य आरोपी दत्ता जाधवसह इतर पाच आरोपी अद्याप फरार आहेत. पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. या सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून परिसरातील दहशत संपुष्टात आणावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे.

Published on: Oct 23, 2025 09:01 AM