Thane MNS News : मराठी भाषेची दैना थांबेना! एमए-मराठी करणाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढ नाही, मनसे आक्रमक

Thane MNS News : मराठी भाषेची दैना थांबेना! एमए-मराठी करणाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढ नाही, मनसे आक्रमक

| Edited By: | Updated on: Feb 27, 2025 | 2:12 PM

Thane Municipal Corporation News : मराठी भाषेच्या संवर्धनासाठी एकीकडे प्रयत्न सुरू असतानाच आता एमए-मराठी करणाऱ्यांना कर्मचाऱ्यांना यापुढे अतिरिक्त वेतनवाढ देण्यात येणार नसल्याचा जीआर ठाणे पालिकेने काढला आहे. त्यामुळे आज मनसेने आक्रमक पवित्रा घेत पालिका आयुक्तांना धारेवर धरलं.

मराठी भाषेतून एमएचे शिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांना यापुढे अतिरिक्त वेतनवाढ न देण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. ठाणे पालिकेने काढलेल्या या परिपत्रकावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. आज राज्यात मराठी भाषा दिन साजरा केला जात असताना अशाप्रकारे परिपत्रक काढून ठाणे पालिकेने मराठीतून शिक्षण घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची गळचेपी केली असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात मराठी भाषा धोरण लागू करत सर्व सरकारी कार्यालयांत मराठी भाषा बोलणे अनिवार्य केले आहे. मात्र असे असतानाच ठाणे पालिकेने मात्र एमए – मराठीचे शिक्षण घेणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अतिरिक्त वेतनवाढ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील परिपत्रक देखील काढण्यात आलेले आहे. सातवा वेतन आयोगात शिक्षणावर आधारित अतिरिक्त वेतनवाढ देय असण्याबाबत शासन निर्देश प्राप्त झालेले नसल्याचे सांगत हा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयावर आता मनसेकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे. आज ठाणे पालिकेत दाखल होत मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी मनसे नेते अविनाश जाधव यांनी महापालिका अतिरिक्त आयुक्तांची भेट घेत त्यांना फैलावर धरलं. मराठी भाषा वाढावी, मराठीतून मुलांनी शिक्षण घ्यावे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. त्यात मराठीतून शिक्षण घेतले म्हणून वेतनवाढ होणार नसेल तर यापुढे असं शिक्षण कोण घेईल? ज्याची पुढे शिकायची असेल तर तो एमए कसा होईल? असा प्रश्न उपस्थित करत आज संध्याकाळपर्यंत हा जीआर रद्द करण्याची मागणी केली.

Published on: Feb 27, 2025 02:12 PM