शिवाजी महाराजांविषयी भाजपाच्या बड्या नेत्याचं खळबळजनक विधान, नव्या वादाला तोंड फुटलं!
भाजपाचे नेते सी आर पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. संजय राऊत यांनी भाजपावर सडकून टीका केली आहे.

BJP Vs Sanjay Raut : सध्या राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर सडकून टीका करत आहेत. असे असतानाच आता भाजपाचे गुजरातमधील नेते तथा केंद्रीय मंत्री सी आर पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या एका विधानामुळे आता चांगलाच वाद निर्माण झाला आहे. सी आर पाटलांच्या या विधानाचा आधार घेत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत यांंनी भाजपाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. तर भाजपानेही राऊतांवर पलटवार केला आहे. आता हा वाद आणखी पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सी आर पाटील नेमकं काय म्हणाले?
सी आर पाटील एक सभेमध्ये बोलत होते. ते गुजराती भाषेत बोलताना दिसत आहेत. यावेळी बोलताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर भाष्य केले. मला खूप आनंद आहे की छत्रपती शिवाजी महाराज हेदखील एक पाटीदार होते. त्यांनी हिंदू स्वराज्याची स्थापना यशस्वीपणे केली, असे सी आर पाटील म्हणाले.
हे सगळे निर्लज्ज लोक- संजय राऊत
आता सी आर पाटील यांच्या याच विधानाचा आधार घेत संजय राऊत यांनी भाजपावर सडकून टीका केली आहे. “छत्रपती शिवाजी महाराज यांना गुजरातला पळवायचा प्रयत्न केला जात आहे. परंतु शिवाजी महाराजांनी तुमची सुरत लुटली होती. तिथे पळापळ, दाणादाण करून सोडली होती. हे त्यांनी विसरू नये,” असा हल्लाोबल संजय राऊत यांनी केला. तसेच शिवाजी महाराजांना जात लावू नये, असे आवाहनही त्यांनी भाजपाला केले आहे. भाजपाचे लोक छत्रपती शिवाजी महाराज यांना पळावायला लागले आहेत. हे निर्लज्ज लोक आहेत. तुमच्या गुजरातमध्ये काय महापुरुष नाहीत का? तिथे सगळे राक्षस आहेत का, असे विचारत राऊतांनी भाजपावर हल्लाबोल केला.
नवनाथ बन यांचा पलटवार
राऊतांच्या या टीकेला नंतर भाजपाचे नेते नवनाथ बन प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापेक्षा अफजलखान जास्त प्रिय आहे. त्यांना अफजलखानाची पिलावळ जास्त प्रिय आहे. अफजलखानाचा उदोउदो करणे हे संजय राऊतांचे काम आहे, असे नवनाथ बन म्हणाले आहेत. त्यामुळे आता ठाकरे गट यावर काय पलटवार करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
