मुंबई महापालिकेत शिंदे-भाजप गटाची एकत्र गट नोंदणी का नाही? मोठी खेळी काय?; थेट मुख्यमंत्रीच म्हणाले…
CM Fadnavis : मुंबई महानगरपालिकेच्या महापौर निवडीला विलंब झाला आहे. कारण भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची अद्याप विभागीय आयुक्तांकडे अधिकृत गट नोंदणी झालेली नाही. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाष्य केले आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीने शानदार विजय मिळवला आहे. हा निकाल लागून 10 दिवस उलटून गेले आहेत, मात्र अद्याप मुंबईला नवीन महापौर मिळालेला नाही. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे महायुतीतील घटक पक्षांची म्हणजेच भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची अद्याप विभागीय आयुक्तांकडे अधिकृत गट नोंदणी झालेली नाही. त्यामुळे हा विलंब होत आहे. तसेच हे दोन्ही पक्ष वेगवेगळा गट स्थापन करणार असल्याचेही समोर आले आहे. आता भाजप आणि शिवसेनेच्या गट स्थापनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
मुंबई महापालिकेतील गट नोंदणीबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले की, ‘गट स्थापन करताना फायद्याचा विचार केला जाणार आहे. महापौर आणि उपमगहापौर पद सोडलं की इतर पदे तुमच्या एकूण संख्येच्या नुसार मिळतात. त्या आधारावर जास्तीत पद मिळावीत यासाठी मोर्चेबांधणी करणार आहोत. दोन्ही गट एकत्र जोडून फायदा आहे की नाही यांचा विचार केला जाईल. स्थायी समितीत जास्तीत जास्तीत सदस्य कसे येतील याचा प्रयत्न केला जाईल. शुद्ध राजकारण येथे असणार आहे. पूर्ण विचाराअंती गट नोंदणी एकत्रित किंवा वेगळी केली जाईल, याबाबत तुम्हाला माहिती नक्कीच कळेल.’
गट स्थानप केल्यानंतर महापौर पदाची निवडणूक पार पडणार
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने 89 आणि शिवसेनेने 29 जागांवर विजय मिळवला आहे. शिवसेना ठाकरे गटाने 65 जागांवर विजय मिळवला आहे, तर काँग्रेसने 24, मनसेने 6, शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 1, एमआयएमने 8 आणि इतरांनी 12 जागांवर विजय मिळवला आहे. भाजप आणि शिवसेना सोडता इतर पक्षांनी गट स्थापन केल्याची माहिती समोर आली आहे. आता भाजप आणि शिवसेनेने गट स्थापन केल्यानंतर महापौर पदाची निवडणूक पार पडणार आहे.
महापौर पदाच्या शर्यतीत कोण?
मुंबईच महापौरपद महिलांसाठी राखीव झालं आहे. भाजपकडे मुंबईत अशा अनेक सक्षम महिला नगरसेविका आहेत. महापौरपदासाठी त्यातल्या काही नावांची चर्चा सुरु झाली आहे. राजश्री शिरवडकर, अलका केरकर, हर्षिता नार्वेकर, रितू तावडे, आशा मराठे, शितल गंभीर, योगिता सुनील कोळी या महिला नगरसेविकांची नावे महापौर पदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.
