‘दमात घेऊ नका’… मुख्यमंत्री आणि गृहमंत्री पण आमच्याकडेच; चंद्रकांत पाटलांचा अजित पवार यांना थेट इशारा
BJP vs Ajit Pawar : अजित पवारांनी भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यामुळे आता भाजपचे नेतेही अजित पवारांच्या आरोपांना आणि टीकेला उत्तर देताना पहायला मिळत आहेत.

राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात झाली आहे. त्यामुळे अनेक नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहे. राज्यात मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून सत्तेत बसलेल्या अजित पवारांनी काल पिंपरी चिंचवडमध्ये बोलताना भाजपवर सडकून टीका केलेली आहे. अजित पवारांनी भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यामुळे आता भाजपचे नेतेही अजित पवारांच्या आरोपांना आणि टीकेला उत्तर देताना पहायला मिळत आहेत. अशातच आता सांगलीतील प्रचारसभेत बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांनी गंभीर इशारा दिला आहे. चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले ते सविस्तर जाणून घेऊयात.
चंद्रकांत पाटील यांचा अजित पवारांना गंभीर इशारा
सांगलीतील प्रचार सभेत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं की, ‘ये घरला जायचयं का असं म्हणाऱ्यांना मी असं म्हणेन की, दमात घेऊ नका आणि हलक्यात पण घेऊ नका, मुख्यमंत्री पण आणि गृहमंत्री पण आमच्याकडे आहेत. विकासावर निवडणूक न्यायची आहे, युतीतील पक्षांनी एकमेकांवर बिलकुल टीका करायची नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. पण सुरुवात टीका झाली, असं किती दिवस चालणार आहे? कुठे थांबणार आहे? याचा अंदाज घेऊन ठरवू असंदेखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
अजित पवारांचे भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप
अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडमध्ये बोलताना भाजपवर आरोप करताना म्हटले की, ‘माझ्यावर सत्तर हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप होता, पण तो सिद्ध झाला का तर नाही. ज्यांनी माझ्यावर आरोप केले त्यांच्यासोबत मी सत्तेत आहे. भाजपने पुण्यात कोट्यवधी रुपयांच्या ठेवी मोडल्या हा एक भ्रष्टाचारच आहे. त्या भ्रष्टाचाराचे पुरावे माझ्याकडे आहेत’ यावरून आता राजकारण तापले आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण काय म्हणाले ?
अजित पवारांच्या आरोपांनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना अजित पवारांना महायुतीत घेतल्याचा पश्चताप होतो का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना चव्हाण म्हणाले की, ‘हो, कार्यकर्ते मला रोज सांगतात. प्रदेशाचा मी अध्यक्ष आहे, त्यामुळं कार्यकर्ते मला हे सांगण्याचा प्रयत्न करतात. मी देवेंद्र फडणवीस यांना म्हटलं होतं, की अजित पवारांना सोबत घेताना विचार करा, असंही चव्हाण यांनी म्हटलं आहे.
