बाळासाहेब असते तर उलटं टांगून फटके दिले असते; शिंदे कडाडले, ठाकरे बंधूंवर घणाघात
आज मुंबईमध्ये महायुतीची सभा पार पडली, या सभेमध्ये बोलताना एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेवर जोरदार हल्लाबोल केला. तुम्ही मराठी माणसांसाठी काय केलं? असा सवाल यावेळी शिंदे यांनी केला आहे.

राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे, प्रचाराला देखील वेग आला आहे. आज मुंबईच्या वरळीमध्ये महायुतीची सभा पार पडली, या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती होती. या सभेत बोलताना एकनाथ शिंदे यांनी ठाकरें बंधू शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांची युती झाली आहे. मराठीचा मुद्दा घेऊन मनसे आणि शिवसेना ठाकरे गट या निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. यावरून एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तुम्ही मराठी माणसांसाठी काय केलं? असा सवाल यावेळी शिंदे यांनी उपस्थित केला आहे. तसेच आज बाळासाहेब ठाकरे असते तर उलटं टांगून फटके दिले असते असंही यावेळी शिंदे यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
मुंबईला स्थगिती सरकार नको, तर प्रगती सरकार पाहिजे आहे. छत्रपती संभाजीनगरात यांनी रशिद मामूला तिकीट दिलं, आज बाळासाहेब असते तर यांना उलटं टांगून फटके दिले असते. जनतेनं बँड वाजवल्यावर यांना ब्रँडची आठवण झाली. मात्र लक्षात ठेवा खरा ब्रँड फक्त बाळासाहेबच आहेत. मागचा महापौर कसा झाला हे आम्हाला माहिती आहे. आम्हाला बकासुराच्या तावडीतून मुंबईला सोडवायचंय आहे, भ्रष्टाचारच्या मगरमिठीतून मुंबईला सोडवायचं आहे, त्यामुळे यावेळी मुंबईवर महायुतीचाच भगवा फडकणार असं शिंदे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेससोबत जाऊन बसण्याचं पाप तुम्ही केलं, मात्र मुंबईत काँग्रेसनेही ठाकरेंच्या सेनेला लाथ मारली. कोण खरा सूर्याजी पिसाळ हे जनतेला माहिती आहे. तुम्ही मराठीसाठी काय केलं? ठाकरेंचा मराठीचा पुळका खोटा आहे. काहींना निवडणूक आली की मराठी माणूस आठवतो, मात्र आता स्वार्थी राजकारणाला मुंबईकर भुलणार नाहीत. भावनेवर मत मिळत नाहीत, लोकांना विकास लागतो, आम्ही विकासाचे वारकारी आहोत, लोकांना विकासाचे मारेकरी नकोत, असं शिंदे यांनी म्हटलं आहे. बॉडी बॅगमध्ये कोणी घोटाळा केला? महापालिकेची कंत्राट देताना मराठी माणसं आठवली नाहीत का? असा सवालही त्यांनी यावेळी ठाकरेंना केला आहे.
