Manoj Jarange : शेतकऱ्यांसाठी मनोज जरांगेंचा एल्गार; राज्यभरात आंदोलन पेटणार, भाऊबीजेला केली मोठी घोषणा
Manoj Jarange Agitation for Farmer : मराठा आंदोलनासाठी रान पेटवणारे मनोज जरांगे पाटील यांनी आता शेतकऱ्यांसाठी एल्गार पुकारला आहे. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. पण अजूनही मदतीचा हात पोहचला नाही. त्याविरोधात जरांगेंनी दंड थोपाटले आहेत.

Manoj Jarange Patil : मराठा आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील यांनी रान पेटवले. मराठा-कुणबी आंदोलनाबाबत हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट लागू करण्याचा निर्णय झाला आहे. आता जरांगे पाटील हे शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरले आहेत. राज्यातील 29 जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपले आहे. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. शेताना तळ्याचं स्वरूप आलं. नदी-ओढ्याकाठच्या जमिनी वाहून गेल्या. शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं. पण मदतीचा मोठा हात अद्यापही शेतकऱ्यांपर्यंत पोहचला नाही. 3 हजारांहून अधिक कोटींच्या पॅकेजची घोषणा झाली. पण दिवाळी संपूनही शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्याविरोधात जरांगे पाटील यांनी भाऊबीजेलाच आंदोलनाचा नांगर टाकला आहे.
राज्यभरात शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन
आज भाऊबीजेच्या दिवशी आम्ही यादी तयार करतोय. लवकरच बैठक घेऊन शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन उभारणार आहे. अनेक ठिकाणी सरकार पेक्षा अधिकारी मोठे झाले आहेत. जे अधिकारी काम करत नाही त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजेत. दिलेली मदत ही मदत म्हणता येणार नाही. तो तात्पुरता आनंद आहे. जसं की फडणवीस हे प्रत्येकाला तात्पुरता आनंद देतात. धनगर समाजाला देखील तात्पुरता आनंद दिला. शेतकऱ्याचे काम करणारे अभ्यासक, तज्ञ, नेते एकत्र बसू. सगळ्यांना फोन करून बोलावणार आहे असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.
लाडकी बहीण आणि दाजीसाठी मैदानात
आमच्याकडे एकच इमानदारीने लढण्याची आणि ती जिंकण्याची गोष्ट आहे. सर्व संघटनेचे, पक्षाचे शेतकरी नेते आम्ही अंतरवालीत बोलावणार. पहिला टप्पा एकत्र बसून चर्चा करु. नंतर सर्वांची बैठक आणि त्यानंतर आंदोलनाची दिशा ठरवणार. आमदारांकडे हजारो कोटींच्या प्रॉपर्ट्या आहेत. तरी त्यांना पाच कोटी देण्यात येत आहेत. भाऊबीज निमित्त लाडक्या बहिणीला लाडक्या दाजीला सगळ्यांना न्याय दिल्याशिवाय शांत बसायचं नाही. असं ऐतिहासिक आंदोलन पुन्हा होणार नाही हे देश सुद्धा पाहिल.
हमीभाव कसा होत नाही, कर्जमुक्ती कशी भेटत नाही, शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना कशा नोकऱ्या देत नाहीत तेही बघू. शेतकऱ्यांना आणि शेतीला नोकरीचा दर्जा देण्याची मागणी करणार आहे. सोनं, चांदी सगळं वाढलं, त्यांचं पाणीही वाढलं मात्र आमच्या दुधाला भाव मिळाला ना, असे जरांगे म्हणाले.
छगन भुजबळांवर टीका
छगन भुजबळ हे टोळ्यांचे मुकादम असल्याचा आरोप त्यांनी केला. बीडच्या ओबीसी एल्गार सभेत धनंजय मुंडे हे गोपीनाथ मुंडेंचे वारस असल्याच्या वक्तव्याचा जरांगेंनी समाचार घेतला. त्यांनी ते वाक्य वापरले खूप अवमान केला एका शब्दात. हा संधी साधू आहे. त्या विचारात वाढलेला वंश आहे ना त्यांच्याकडे, त्रास देणारा कसा होऊ शकतो वारस चालवणारा, असा प्रश्न त्यांनी केला. त्यांचे हात रक्ताने भरलेले आहेत. त्यांनी हयातीत गोपीनाथ मुंडे यांना खूप त्रास दिला आहे. जो खरा वारस आहे तो हे विसरतो तरी कसा काय? जातीचा म्हणून किंवा तुमच्या घरातलं घर आहे म्हणून विसरताय त्रास दिलेला इतका, ही कुठली परंपरा आहे, असे जरांगे म्हणाले.
महादेव मुंडे हत्या प्रकरण
महादेव मुंडे हत्या प्रकरणात तपास सुरू आहे. कालच त्यांचे बंधू आणि आठ-दहा लोक माझ्याकडे आले होते. मॅटरमध्ये पडल्यावर मी मागे नाही हटत ते कोणाचंही असो. पुन्हा मराठ्याच्या नादी लागायचं नाही. आमच्यात एक म्हण आहे त्याचे 99 गुन्हे झाले भरू द्या. गुंडाच्या टोळीचं ऐकून मराठ्यांनीच परळीत मराठ्यांना त्रास देऊ नका. आमच्यापर्यंत आलं आहे त्याचं ऐकुन त्रास दिला जातोय. बीड जिल्ह्यातल्या आणि परळीतल्या प्रत्येक गावात आम्ही लक्ष ठेवून आहोत. इथून पुढे लक्षात ठेवा, असा इशारा त्यांनी दिला.
मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
तिकडे ओबीसींना म्हणायचं तुमच्या आरक्षणाला हात लागला नाही आणि इकडे आम्हाला जीआर द्यायचा. जीआर द्यायचा पण प्रमाणपत्र द्यायचे नाहीत. तर लक्षात ठेवा आंदोलन कुठल्याही दिशेला जाऊ शकतं. हे फडणवीस यांनी लक्षात ठेवावं असे जरांगे म्हणाले. 1994 चा जीआर निघाला त्याचे प्रमाणपत्र ते आत्तापर्यंत काढत आहेत. जीआर निघालाय तो तुम्हाला कायमचा झाला हे समजून घ्या. या जीआरच्या आधारे एका वर्षात सगळ्यांना आरक्षणात घालू. तो आली बाबा म्हणतोय संविधानापेक्षा जीआर मोठा नाही. जर आमचा जीआर संविधानापेक्षा मोठा नाही तर तुमचा सुद्धा जीआर संविधानापेक्षा मोठा नाही हे लक्षात घ्या. आमच्या जीआर ला काही झालं तर तुमच्यालाही होणार. 16% जीआर आहे त्यामध्ये 30,20, 25 जाती घातल्या ते सगळं मला माहित आहे, असा इशाराही जरांगेंनी दिला.
