केडीएमसीत 20 जागा बिनविरोध, पण महायुतीच्या बालेकिल्ल्याला भगदाड, कुठे काय घडलं?
कल्याण-डोंबिवली निवडणुकीत टिटवाळ्यात महायुतीत मोठी बंडखोरी झाली आहे. माजी उपमहापौर बुधराम सरनोबत आणि उपेक्षा भोईर आमने-सामने आल्याने पॅनल ३ मधील लढत रंगतदार झाली असून, याचा फटका महायुतीला बसणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी प्रचाराच्या फैरी झडताना दिसत आहेत. त्यातच आता टिटवाळा परिसरात महायुतीला अंतर्गत बंडखोरीचा मोठा फटका बसताना दिसत आहे. टिटवाळ्यातील पॅनल क्रमांक ३ मध्ये भाजपचे दोन माजी उपमहापौर एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत. त्यामुळे आता ही निवडणूक प्रतिष्ठेची आणि अत्यंत चुरशीची बनली आहे.
टिटवाळ्यात मात्र वेगळे चित्र
एकीकडे कल्याण-डोंबिवलीत महायुतीचे २० उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. पण टिटवाळ्यात मात्र चित्र वेगळे आहे. टिटवाळ्यात भाजप आणि शिवसेनेच्या अधिकृत पॅनलसमोर पक्षातील नाराज इच्छुकांनी मांडा-टिटवाळा-अटाळी परिवर्तन आघाडी स्थापन करून थेट आव्हान दिले आहे. टिटवाळा परिसरातील पॅनल क्रमांक ३ मध्ये महायुतीच्या अधिकृत पॅनलमध्ये उपेक्षा भोईर (भाजप), संदीप तरे (भाजप), बंदिश जाधव (शिवसेना) आणि हर्षली थविल (शिवसेना) यांचा समावेश आहे. तर त्यांच्या विरोधात मांडा-टिटवाळा-अटाळी परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून बंडखोरी करत अंजनाताई बुधराम सरनोबत, सचिन आल्हाद, मीना विजय देशेकर आणि मोरेश्वर अण्णा तरे यांनी आपले आव्हान उभे केले आहे.
केवळ विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवतोय
याप्रकरणी माजी उपमहापौर बुधराम सरनोबत यांनी पक्षावर अन्यायाचा आरोप केला आहे. पक्षाने १० वर्षे आमच्याकडून काम करून घेतले, पण तिकीट वाटपात मातीतल्या उमेदवारांना डावलले गेले. आम्ही उपमहापौर असताना सुरू केलेली कामे आजही अपूर्ण आहेत. जनतेचा आम्हाला नैतिक पाठिंबा असल्याने आम्ही दबावाला न जुमानता निवडणूक लढवत आहोत, असा आरोप माजी उपमहापौर बुधराम सरनोबत यांनी केला आहे. तर दुसरीकडे, महायुतीच्या अधिकृत उमेदवार आणि माजी उपमहापौर उपेक्षा भोईर यांनी संयमी भूमिका मांडली आहे. मी या गावाची मुलगी आणि सून आहे. आम्ही एकमेकांचे विरोधक नाही, तर स्थानिक लोक आहोत. मी १५ वर्षांच्या प्रवासात कधीही खालच्या पातळीवर जाऊन टीका केली नाही. आम्ही केवळ विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवत आहोत असे त्यांनी स्पष्ट केले.
कपिल पाटील काय म्हणाले?
या बंडखोरीवर माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी कडक शब्दांत टीका केली आहे. अपक्ष उमेदवार हे आयाराम-गयाराम असून केवळ स्वार्थासाठी पक्ष बदलत आहेत. त्यांनी लोकसभा निवडणुकीतही विरोधकांसाठी काम केले होते. अशा बंडखोरांचा पक्षात कोणताही आधार नाही. भाजप-शिवसेनेचा कट्टर कार्यकर्ता अधिकृत उमेदवारांच्याच पाठीशी उभा राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान दोन माजी उपमहापौर एकाच प्रभागात आमने-सामने आल्याने टिटवाळ्यातील राजकीय वातावरण तापले आहे. महायुतीमधील हा अंतर्गत कलह अधिकृत उमेदवारांचे नुकसान करणार की विरोधकांच्या पथ्यावर पडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
