AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News LIVE : मुंबईत चाहत्यांना भेटून आनंद होतोय – सूर्यकुमार यादव

| Edited By: | Updated on: Mar 31, 2026 | 6:55 PM
Share

Maharashtra News LIVE Updates : आमदार दीपक केसरकर यांच्यासह पक्षातील दोन मंत्र्यांवर एकनाथ शिंदे नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणात केसरकर यांच्यावर विविध आरोप होत आहेत.

Maharashtra News LIVE : मुंबईत चाहत्यांना भेटून आनंद होतोय - सूर्यकुमार यादव
TV9 Marathi BlogImage Credit source: Instagram

LIVE NEWS & UPDATES

  • 31 Mar 2026 06:55 PM (IST)

    15 जूनपासून शाळा सुरू करण्यास विदर्भातील शिक्षकांचा विरोध

    15 जूनपासून शाळा सुरू करण्यासंदर्भात शासनाने काढलेल्या परिपत्रकाला विदर्भातील शिक्षक संघटनांनी विरोध केला आहे. विदर्भातील उन्हाचा तडाखा पाहाता शाळा या 25 जून ते 1 जुलै दरम्यानच सुरू करण्यात याव्यात अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे.

  • 31 Mar 2026 06:45 PM (IST)

    भांडण सोडवायला गेलेल्याच्या पोटात सुरा खुपसला

    बीडच्या केज तालुक्यातील शिरूरघाट गावात विहीरीच्या वाटणीवरून कुटुंबात वाद सुरू होता.लाठ्या काठ्यांनी सुरू असलेला वाद मिटविण्यासाठी मध्यस्थी करायला गेलेल्या शेजारचे सुंदर सांगळे यांच्या पोटात आरोपी राजेंद्र सांगळे याने कमरेला असलेला सुरा काढुन खुपसला. यात सुंदर सांगळे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बीड शहरातील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी केज पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 31 Mar 2026 06:34 PM (IST)

    मुंबईत चाहत्यांना भेटून आनंद होतोय – सूर्यकुमार यादव

    मुंबईत आयपीएलच्या सध्या थरार अनुभवायला मिळत आहे. मुंबई इंडियन जिंकल्यानंतर मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमच्या बाहेर सर्व क्रिकेटर्सचे स्वागत करण्यासाठी क्रिकेट प्रेमींची मोठी गर्दी झाली आहे. विशेष करून सूर्यकुमार यादव याला पाहण्यासाठी त्याचे चाहते लांबून या ठिकाणी पोहोचले आहेत, सेल्फी आणि फोटो काढण्यामध्ये सर्व चाहते व्यस्त असताना हे सगळं पाहून मला फार आनंद होतोय अशी प्रतिक्रियां टीव्ही ९ मराठीशी बोलताना भारतीय टी २० क्रिकेटचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने दिली आहे.

  • 31 Mar 2026 06:15 PM (IST)

    जयंत पाटलांचा इतिहास आहे, जिथे जिथे शक्य आहे,तिथे बिब्बा टाकायचा- मंत्री चंद्रकांत पाटील

    जयंत पाटलांचा इतिहास आहे, जिथे जिथे शक्य आहे,तिथे बिब्बा टाकायचा,असा आरोप भाजपाचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर यांच्याबाबत देखील जयंत पाटील यांनीच बिब्बा टाकल्याचे ते म्हणाले.

  • 31 Mar 2026 05:53 PM (IST)

    सातारा : शासकीय रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल

    साताऱ्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात निष्काळजीपणाचा कळस पाहायला मिळाला. मृत्यूनंतरही मृत शरीराची हेळसांड झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. वाई तालुक्यातील सोनगरवाडी येथील 26 वर्षीय आनंद ओव्हाळ आणि आरळे येथील 51 वर्षीय सुरेश खोमणे या दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाने दोन्ही नातेवाईकांना चेहरा न दाखवता मृतदेह ताब्यात दिले आणि याच ठिकाणी मोठी चूक झाली. कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मृतदेहांची थेट अदलाबदल झाली. एका कुटुंबाने चुकीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. चिता पेटल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

  • 31 Mar 2026 05:38 PM (IST)

    छत्रपती संभाजीनगर : वादळी वाऱ्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात वादळी वाऱ्याचा मोठा फटका शेतीला बसला आहे. देवगाव शिवारात कांदा बीज आणि गहू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. काढणीला आलेला गहू पूर्णपणे आडवा पडला असून शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे. त्याचबरोबर कांदा बीज उत्पादनालाही मोठा फटका बसणार आहे. यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ पंचनामे करून शासनाकडून आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.

  • 31 Mar 2026 05:18 PM (IST)

    नाशिक : अवकाळी पावसामुळे शेतमालाचे मोठे नुकसान

    नाशिकच्या विविध भागात गारपीट व अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. खास करून सटाणा तालुक्यात या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. कांदा, गहू, डाळींब, आंबा व फळबागा तसेच भाजीपाला पिकांना फटका बसल्याने बळीराजा हतबल झाला आहे.

  • 31 Mar 2026 05:13 PM (IST)

    बीड – माजलगावमध्ये 9 वर्षाच्या चिमुकलीचा झोका खेळताना फास लागून मृत्यू

    माजलगाव शहरातील खंडोबा मैदान परिसरात नऊ वर्षाची चिमुकली आपल्या घरात झोका खेळत होती. बऱ्याच वेळानंतर ती खुर्चीवर चढुन झोका पकडण्याचा प्रयत्न करत होती. यावेळी खुर्ची निसटल्याने थेट गळ्याला दोरीचा फास लागला. या दरम्यान अचानक तिच्या गळ्याला दोरीचा फास लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

  • 31 Mar 2026 03:58 PM (IST)

    डोंबिवली रील स्टार सुरेंद्र पाटील शस्त्रसाठा प्रकरणात मोठा खुलासा

    डोंबिवली रील स्टार सुरेंद्र पाटील शस्त्रसाठा प्रकरणात मोठा खुलासा समोर आला आहे. चपलांच्या स्टॅन्डमध्ये गुप्त कप्पा होता. त्यातून 7 पिस्तूल, 370 जिवंत काडतुसे दोन एअर गण जप्त करण्यात आल्या. तलवार, चॉपर, चाकूंसह घातक शस्त्रसाठा पोलिसांच्या हाती लागला आहे. बंगल्यावर छापा टाकत आरोपीला बेड्या ठोकल्या.

  • 31 Mar 2026 03:56 PM (IST)

    सातारा जिल्हा परिषदेतील सीसीटीव्ही बंद!

    सातारा जिल्हा परिषदेतील सीसीटीव्ही बंद असल्याचं पत्र समोर आलं आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याची वायर तुटल्याचा पत्रात उल्लेख करण्यात आला आहे. राड्यादरम्यानच्या सीसीटीव्ही रेकॉर्डिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

  • 31 Mar 2026 03:50 PM (IST)

    2 वर्षांच्या चिमुकल्याची 6 तास व्हेंटिलेटरवर मृत्यूशी झुंज

    छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 वर्षांच्या चिमुकल्याची 6 तास व्हेंटिलेटरवर मृत्यूशी झुंज दिली.   श्वसननलिकेत अडकलेला सिमेंटचा खडा डॉक्टरांनी यशस्वीरीत्या काढला. घाटी रुग्णालयातील डॉक्टरांना मोठे यश मिळाले आहे. चिमुकल्याची प्रकृती स्थिर आहे

  • 31 Mar 2026 03:46 PM (IST)

    आसाममध्ये भाजप पुन्हा सत्तेवर येईल, आम्ही 96-100 जागा जिंकू – मुख्यमंत्री सरमा

    आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी म्हटले आहे की, यावेळी राज्यात भाजप पुन्हा सत्तेवर येईल. आम्ही 96-100 जागा जिंकू. काँग्रेस 15-20 जागा जिंकेल. याशिवाय, यूडीएफ 5-6 जागा जिंकेल.

  • 31 Mar 2026 03:41 PM (IST)

    सोनिया गांधी रुग्णालयातून घरी परतल्या

    काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी संसर्गातून बऱ्या झाल्यानंतर सर गंगा राम रुग्णालयातून घरी परतल्या आहेत. ताप आल्याची तक्रार केल्यानंतर त्यांना 24 मार्च रोजी रात्री 10.20 च्या सुमारास रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

  • 31 Mar 2026 03:40 PM (IST)

    भाजपने 5 कोटी मतदारांची नावे काढून टाकली असती: मुख्यमंत्री ममता

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गडबेता येथील एका निवडणूक सभेत म्हणाल्या की, जर आम्ही ठाम राहिलो नसतो, तर भाजपने बंगालच्या मतदार यादीतून 5 कोटी नावे वगळली असती.

  • 31 Mar 2026 03:00 PM (IST)

    भोंदू अशोक खरात 4 मोबाईल नंबर वापरत असल्याची माहिती

    भोंदू अशोक खरातची गेल्या 5 तासांपासून एसआयटीकडून चौकशी सुरू आहे. खरात 4 मोबाईल नंबर वापरत असल्याची माहिती समोर आली आहे. 1 नंबर फक्त vip लोकांसाठी वापरत असे तर दुसरा नंबर हा विशेष काही भक्तांसाठी व महिलांसाठी वापरत असल्याची सूत्रांची माहिती

  • 31 Mar 2026 02:45 PM (IST)

    अश्विनी भिडे पहिल्या महिला आयुक्त

    मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आयुक्तपदी मेट्रो वुमेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी याबाबत अधिकृत घोषणा केली.

  • 31 Mar 2026 02:32 PM (IST)

    भाईंदर : रेल्वे रुळावर पडून प्रवाशाचा मृत्यू

    भाईंदरच्या रेल्वे स्थानक फलाट क्रमांक 1 वरील रेल्वे रुळावर पडून प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सकाळच्या गर्दीच्या वेळी मीरा-भाईंदर परिसरातून मोठ्या संख्येने नोकरदार मुंबईकडे प्रवास करत असताना ही दुर्घटना घडली. यामुळे फलाट क्रमांक एक वरील रेल्वे सेवा काही काळ खोळंबली होती, मात्र मृतदेह बाहेर काढल्यानंतर रेल्वे सेवा पुन्हा सुरळीत सुरू झाली आहे.

  • 31 Mar 2026 02:15 PM (IST)

    धाराशिव : जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा

    हवामान विभागाने पुढील पाच दिवसाचा दिलेल्या अलर्टनुसार छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्याना काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा दिला आहे. तर बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्याना विजांच्या कडकडाटासह गारपिटीचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

  • 31 Mar 2026 02:00 PM (IST)

    अशोक खरात प्रकरणात वन विभागाची एंट्री

    भोंदू अशोक खरात प्रकरणी वन्यजीव संरक्षण कायदा अंतर्गत वन विभाग देखील कारवाई करणार. अशोक खरात या प्रकरणात एसआयटी चौकशी सुरू असून वनविभागाने देखील एसआयटीला पत्र दिले आहे. भोंदू अशोक खरात यांनी काही प्राण्यांची शिकार करत अघोरी पूजेसाठी वापर केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.

  • 31 Mar 2026 01:53 PM (IST)

    एटीएम कार्डमार्फत मोठी फसवणूक

    ओडिशाहून मुंबईला विमानाने येऊन एटीएममध्ये ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. मुंबईत वरिष्ठ नागरिकांना टार्गेट करत एटीएम कार्डची अदलाबदली करून फसवणूक करणाऱ्या आरोपीविरोधात दिंडोशी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून अनेक एटीएम कार्ड आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की हा आरोपी ओडिशा राज्यातून विमानाने मुंबईत येत असे आणि एटीएम मशीनमध्ये पैसे काढणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना बोलण्यात गुंतवून त्यांचं कार्ड बदलून फसवणूक करत होता.

  • 31 Mar 2026 01:42 PM (IST)

    अशोक खरातचे तपासात सहकार्य नाही

    आजही SIT च्या चौकशीत अशोक खरात सहकार्य करत नसल्याची माहिती समोर येत आहे. सलग १३ व्या दिवशी देखील खरातची चौकशी सुरू आहे. गेल्या ३ तासापासून खरातवर प्रश्नांची सरबत्ती सुरू आहे. SIT ला दोन मोबाईलचा डेटा फॉरेन्सिक टीमकडून क्लोन करून मिळालाय

  • 31 Mar 2026 01:32 PM (IST)

    शहरी भागातील ऑटो चालकांची ग्रामीण एलपीजी गॅस पंपाकडे धाव

    जळगाव शहरातील पाचही एलपीजी गॅस पंप बंद असल्याने ग्रामीण भागातील एलपीजी गॅस पंपावर ऑटो रिक्षा चालकांची गर्दी केली आहे. शहरातील पाचही एलपीजी गॅस पंप बंद झाल्यामुळे पाच ते दहा किलोमीटर ग्रामीण भागात जाऊन रिक्षात गॅस भरण्याची चालकांवर वेळ आली आहे. 58 रुपये प्रति लिटर मिळणारा गॅस ग्रामीण भागातील एलपीजी कंपनीवर तब्बल 125 रुपये लिटर मिळत असल्याचे चित्र आहे. वाढत्या दरामुळे तसेच पाच ते दहा किलोमीटर जाऊन एलपीजी गॅस मिळत असल्याने रिक्षा चालकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जळगाव शहरातील पाचही एलपीजी गॅस पंप बंद असल्याने रिक्षाचालकांनी आपला मोर्चा आता ग्रामीण भागातील एलपीजी गॅस पंपाकडे वळवला आहे.

  • 31 Mar 2026 01:22 PM (IST)

    नाईट ड्युटीसाठी मागितली लाच

    काशिमीरा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सागर इंगोले यांनी कमल चव्हाण या महिला हवालदाराला ‘नाईट ड्युटी’ देण्यासाठी दरमहा १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या प्रकरणात ड्युटी अंमलदार सहायक पोलीस उपनिरीक्षक गोलार यांचाही समावेश आहे. गोलार यांनी साहेबांसाठी १५ हजार आणि स्वतःसाठी ५ हजार, अशी एकूण २० हजार रुपयांची मागणी केली होती.

  • 31 Mar 2026 01:12 PM (IST)

    माऊलींच्या पालखी मुक्कामासंबंधी 13 एप्रिल रोजी अंतिम निर्णय

    माऊलीच्या पालखी मुक्कामासंबंधी 13 एप्रिल रोजी अंतिम निर्णय घेण्यात येईल असे आळंदी संस्थानचे विश्वस्त राजेंद्र उमाप म्हणाले. पालखीचा मुक्काम ठिकाण बदलण्यावर पालखी प्रमुखांचा भर, एस पी कॉलेज, सनस मैदान आणि नेहरू स्टेडियम हे पर्याय आहेत. 28 मार्च 2026 रोजी दिंडी समाज संस्थान वारकरी यांच्यासोबत चर्चा झाली. भवानी पेठ येथे वारकऱ्यांची गैरसोय होते. जागा अपुरी पडते, त्या जागेऐवजी दुसऱ्या जागेचा विचार करावा अशी सूचना आली असल्याचे समोर आले आहे.

  • 31 Mar 2026 01:00 PM (IST)

    अशोक खरात प्रकरणाला एक धक्कादायक वळण

    अशोक खरातप्रकरणात नाशिक मधील काही नामांकित डॉक्टर तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहेत. महिलांना गर्भधारणा होऊ नये म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने अशोक खरात काही गोळ्या औषध देत होता का ? संशय व्यक्त केला जातोय. महिलांना संमोहित करण्यासाठी देखिल काही मेडिसीनचा वापर केला जात होता का ? हा देखील प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

  • 31 Mar 2026 12:57 PM (IST)

    मेळघाट परिसरात अवकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली

    मेळघाट परिसरात अवकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे सुमारे दीडशे क्विंटल मका पूर्णपणे भिजला. अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका चिखलदरा तालुक्याला बसला. चिखलदरा तालुक्यातील काही भागात गारपिटही झाली. गंगारखेड, कोटमी, कोरडा, हिरडा, जरीदा, चूरणी, मोहरियाम, कामीदा, भंडोरा आणि काटकुंभ परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले. आदिवासी विकास महामंडळाच्या केंद्रावर मोजमाप न झाल्याने तीन दिवसांपासून मका पडून होता, त्यामुळे पावसात तो भिजला. कोणतीही संरक्षणात्मक उपाययोजना नसल्याने नुकसान झाले असून शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

  • 31 Mar 2026 12:45 PM (IST)

    अवकाळी पावसाचा चाळीसगाव तालुक्याला मोठा फटका

    जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मका, गहू, ज्वारी, बाजरी, कांदा यांसारखी पिके आडवी पडली असून काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दहा दिवसांपूर्वीही 28 गावांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला होता, तर आता सुमारे 27 गावांमधील हजारो हेक्टर क्षेत्र या पावसाच्या फटक्यात सापडले आहे. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला असून शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

  • 31 Mar 2026 12:30 PM (IST)

    भोंदू अशोक खरातची सलग 13 व्या दिवशी SIT कडून चौकशी सुरू

    भोंदू अशोक खरातची सलग 13 व्या दिवशी SIT कडून चौकशी सुरू  आहे.  उद्या पोलीस कोठडी संपणार असून नाशिक न्यायालयात हजर करणार आहेत.  जप्त केलेल्या मोबाईलमधील डेटावरून तपासाला वेग आला आहे. कॉल रेकॉर्ड, चॅट्स आणि आर्थिक व्यवहारांची सखोल छाननी सुरू आहे. मोबाईल डेटावरून नवीन धागेदोरे मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खरातच्या संपर्कातील व्यक्तींची आज चौकशी होण्याची शक्यता आहे.

  • 31 Mar 2026 12:20 PM (IST)

    जळगावच्या हिंस्त्र प्राण्याने दोन महिन्यांच्या बालिकेला उचलून नेत ठार केल्याची घटना घडली

    जळगावच्या चोपडा तालुक्यातील मामलदे येथे हिंस्त्र प्राण्याने दोन महिन्यांच्या बालिकेला उचलून नेत ठार केल्याची घटना घडली. या घटनेत दोन महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू झाला असून शेताजवळ काही अंतरावर तिचे अवशेष आढळून आले. शेतात दोन महिन्यांची बालिका आईच्या कुशीत झोपलेली असताना रात्रीच्या वेळी अज्ञात हिंस्त्र प्राण्याने तिला उचलून नेल्याची धक्कायक घटना घडली. सकाळी बालिका दिसून न आल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता, शेताजवळ काही अंतरावर तिचे अवशेष आढळून आले. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाच्या कारभारावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान हिंस्र प्राणी कुठला कोणता याबाबतची नेमकी माहिती अद्याप समोर आलेली नाही त्याबाबत तपास सुरू आहेत.  घटनास्थळी पोलिसांनी भेट देत पाहणी केली असून या प्रकरणात नोंद करण्याचे काम सुरू आहे…

  • 31 Mar 2026 12:07 PM (IST)

    छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी पंप तीन ते चार किलोमीटरच्या रांगा

    छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी पंप तीन ते चार किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत.  दोन दिवसांपासून शहरातील सगळे ऑटो एलपीजी पंप बंद, संपूर्ण शहरात एकच पंप सुरू आहे.  छत्रपती संभाजीनगरच्या सावंगी परिसरात सुरू असलेल्या गॅस पंपावर रिक्षा चालकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.  ऑटो एलपीजी गॅस मिळत असल्याने काल रिक्षा चालकांनी संप केला होता. एलपीजी गॅसच्या प्रतीक्षेत शेकडो ऑटो रिक्षा चालक रांगेत उभे दिसले.  सकाळी सहा वाजल्यापासून ऑटो रिक्षा चालकांनी रांगा लावल्या. नायरा गॅस पंपावर आज 90 रुपये प्रति लिटर गॅसचा भाव आहे.

  • 31 Mar 2026 11:57 AM (IST)

    भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठी खळबळ; ४५ बडे राजकीय नेते संपर्कात

    नाशिकमधील बहुचर्चित भोंदू अशोक खरात प्रकरणात आता राजकीय वर्तुळाचे धाबे दणाणले आहेत. खरातच्या संपर्कात राज्यातील ४० ते ४५ बडे राजकीय नेते नियमितपणे असल्याची खळबळजनक माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे, खरातच्या मुलीच्या लग्नपत्रिकेत सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाजूंच्या दिग्गज नेत्यांची नावे असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हे नेते महत्त्वाचे राजकीय निर्णय घेण्यापूर्वी किंवा निवडणुकीचा अर्ज भरण्यापूर्वी खरातचा सल्ला आणि मुहूर्त विचारत असत. एसआयटीला (SIT) दोन दिवसांपूर्वीच फॉरेन्सिक टीमकडून मोबाईलचा ‘क्लोन’ डेटा अहवाल प्राप्त झाला असून, त्यात नेत्यांची नावे ‘कोडवर्ड’मध्ये जतन केल्याचे आढळले आहे. या तांत्रिक पुराव्यांमुळे आता राजकीय क्षेत्रात कोणाचे नाव समोर येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • 31 Mar 2026 11:47 AM (IST)

    परभणीत अवकाळीचा हाहाकार, चिकूच्या बागा उद्ध्वस्त, आंबा उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता

    परभणी जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे फळबागांचे अतोनात नुकसान झाले असून बागायतदार शेतकरी हवालदिल झाला आहे. विशेषतः चिकू उत्पादक शेतकऱ्यांना या पावसाचा मोठा फटका बसला असून अनेक बागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. पावसासोबतच बदललेल्या वातावरणामुळे आंब्याचा मोहोर गळणे आणि फळांचे नुकसान होण्याचे प्रमाण वाढले आहे, ज्यामुळे यंदा आंबा उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हाताशी आलेले पीक निसर्गाच्या लहरीपणामुळे वाया गेल्याने शेतकऱ्यांसमोर आता मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.

  • 31 Mar 2026 11:37 AM (IST)

    धुळ्यात गॅसचा तुटवडा, नागरिकांची प्रचंड गर्दी; नोंदणी असूनही सिलेंडर मिळेना

    धुळे शहरातील साखरी रोडवरील ओम गॅस एजन्सीवर गेल्या २५ दिवसांपासून सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने ग्राहकांचा संयम सुटला आहे. नोंदणी पूर्ण होऊन आणि मोबाईलवर ओटीपी येऊनही सिलेंडर मिळत नसल्याने संतप्त नागरिकांनी एजन्सीवर मोठी गर्दी केली होती. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच पुरवठा विभागाने या एजन्सीला नोटीस बजावली होती. मात्र परिस्थिती अद्याप सुधारलेली नाही. सिलेंडरची गाडी वेळेवर न आल्याने हा विलंब झाल्याचे एजन्सी संचालकांचे म्हणणे असून, पुढील दोन दिवसांत पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. आता नोटीस देऊनही सुधारणा न झाल्याने प्रशासन काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • 31 Mar 2026 11:27 AM (IST)

    गडचिरोलीत जंगल परिसरात मोठी आग; वनविभागाची धाव

    गडचिरोली जिल्ह्यातील चात गाव जंगल परिसरात मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत वनसंपत्तीचे मोठे नुकसान झाले आहे. वनविभागाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. धानोरा, कुरखेडा आणि कोरची भागात सक्रिय असलेले वनतस्कर सागवान वृक्षांची तस्करी करण्यासाठी जाणीवपूर्वक झाडांना आग लावून ती पाडतात, अशी शंका व्यक्त केली जात आहे. मध्यरात्री लागलेली ही आग अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण केले. या घटनेमुळे वनतस्करांच्या नवनवीन क्लृप्त्या आता प्रशासनाच्या रडारवर आल्या आहेत.

  • 31 Mar 2026 11:17 AM (IST)

    आसामच्या निवडणुका भाजपच जिंकणार – देवेंद्र फडणवीस

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वात नक्षलवाद संपलाय. आसामच्या निवडणुका भाजपच जिंकणार, काँग्रेस निवडून येणार नाही हे जनतेलाही माहिती आहे, देशातील लोकांचा काँग्रेसवर विश्वास नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

  • 31 Mar 2026 11:07 AM (IST)

    मुक्ताईनगर, भुसावळ आणि बोदवड परिसरात अवकाळीसह गारपिटीचा तडाका, बळीराजा संकटात

    मुक्ताईनगर, भुसावळ आणि बोदवड तालुक्यात काल झालेल्या भीषण अवकाळी पाऊस, वादळी वारा आणि गारपिटीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. काढणीला आलेली ज्वारी, मका आणि इतर पिके जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. मुलाप्रमाणे जपलेले पीक डोळ्यादेखत उद्ध्वस्त झाले, अशी आर्त हाक शेतकरी देत आहेत. आधीच आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे वाढलेली महागाई आणि मागील नुकसानीची अद्याप न मिळालेली मदत, अशा दुहेरी संकटात बळीराजा सापडला आहे. प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून मदत जाहीर करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

  • 31 Mar 2026 10:51 AM (IST)

    अवकाळी पाऊस, वादळी वारा व गारपिटीमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये शेती पिकाला फटका

    अवकाळी पाऊस, वादळी वारा व गारपिटीमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये हजारो हेक्टरवर शेती पिकाला फटका बसला आहे.  पैठण तालुक्यातील कांदा बीज उत्पादक बागा भोई सपाट, डाळिंबाच्या बागाही आडव्या झाल्या . काढणीला आलेला गहू मातीमोल झाल्याने शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळलं असून – नुकसानीचे तातडीने पंचनामे करून भरपाई द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

  • 31 Mar 2026 10:37 AM (IST)

    राहाता / अहिल्यानगर – वादळाने विजेची तार कोसळून 9 गाईंचा मृत्यू

    राहाता / अहिल्यानगर –  वादळाने विजेची तार कोसळल्यामुळे 9 गाईंचा मृत्यू झाला. राहाता तालुक्यातील पाथरे गावात ही दुर्दैवी घटना घडली.  काल संध्याकाळी जोरदार वादळी पाऊस झाला, ज्यामुले शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. संजय घोलप यांच्या गोठ्यातील नऊ गाई मृत्यूमुखी पडल्या.

  • 31 Mar 2026 10:21 AM (IST)

    जळगाव- वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्र उडून गेल्याने नुकसान

    जळगावच्या धरणगाव तालुक्यात काल सायंकाळी तसेच रात्री जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला.  जोरदार वादळी वाऱ्यामुळे झूरखेडा येथे सुमनबाई गायकवाड यांच्या घरावरील संपूर्ण पत्रे गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. पत्रे उडाल्यामुळे पावसामुळे घरातील धान्य तसेच इतर वस्तू भिजल्याने त्रास सहन करावा लागत आहे.

  • 31 Mar 2026 10:05 AM (IST)

    चारकोप गावात एलपीजी गॅस सिलिंडरसाठी लोकांची प्रचंड गर्दी

    चारकोप गावात एलपीजी गॅस सिलिंडरसाठी लोकांची प्रचंड गर्दी झाली आहे. काल गॅस सिलिंडर न मिळाल्याने संतप्त लोकांनी याच ठिकाणी गोंधळ घातला होता.

    आणि आजही चारकोप गावात सकाळपासून लोक एचपी गॅस सिलिंडरसाठी रांगेत उभे आहेत.

  • 31 Mar 2026 09:50 AM (IST)

    वसई विरार महापालिकेचे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी आज होणार सेवानिवृत्त

    महापौर अजीव पाटील यांच्या पुढाकारातून आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांचा सोमवारी पालिकेच्या महासभेत सेवानिवृत्तीचा सत्कार करून, त्यांचा निरोप समारंभ पार पडला आहे. तत्कालीन आयुक्त अनिलकुमार पवार यांना ईडी ने अटक केल्या नंतर मनोजकुमार सूर्यवंशी यांनी 8 महिन्यांपूर्वी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला होता. वसई विरार ची डागालेल्या परिस्थिती मध्ये मनोजकुमार सूर्यवंशी यांनी प्रशासनाचे मनोबल वाढवून, शहराच्या विकासात्मक अनेक प्रोग्रॅम हाती घेऊन प्रशासनावर चांगली पकड बसविली होती.

  • 31 Mar 2026 09:40 AM (IST)

    भोंदू बाबा खरात प्रकरणात आणखी एक माहिती आली समोर

    महिलांसाठी बाबा वापरायचा वेगळा मोबाईल. इतर भाविकांसाठी वेगळा मोबाईल असायचा. महिलांच्या नंबर साठी बाबाने घेतलेला वेगळा मोबाईल. कोणाला लक्षात येऊ नये यासाठी भोंदू बाबा खरातचा होता वेगळा पॅटर्न. महिलांसाठीच्या मोबाईल मध्ये होते फक्त महिलांचे नंबर. बाबाच्या प्रभावाखाली असलेल्या महिलांचे नंबर सेव्ह केले होते वेगळ्याच नावाने..

  • 31 Mar 2026 09:30 AM (IST)

    अटल सेतूकडे वाहन चालकांची पाठ, थेट..

    अटल सेतूवरून 26 महिन्यात दोन कोटी वाहनांनी प्रवास केला. दिवसाला 70 हजार ऐवजी केवळ 25 हजार 600 वाहनांचा प्रवास. 26 महिन्यात अटल सेतूवरून 1 कोटी 81 लाख 95 हजार हलक्या वाहनांनी प्रवास केला. हलक्या व्यावसायिक वाहनाची संख्या 5 लाख 98 हजार 525 इतकी नोंद. त्याचवेळी 12 लाख 6 हजार 73 मध्यम, जड आणि अवजड वाहनांचा अटल सेतूवरून प्रवास. त्यामुळे वाहनांची अपेक्षित संख्या गाठण्यात एम एम आर डी ए ला दोन वर्षांनंतर देखील यश आले नाही. अटल सेतूवरून प्रवास करताना भरमसाठ टोल भरावा लागतो तर वाशी टोल नाकाला हलक्या वाहनांना टोल माफी आहे

  • 31 Mar 2026 09:20 AM (IST)

    बीड जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

    बीड जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. बीडच्या आहेर धानोरा गावात काढुन टाकलेल्या उन्हाळी बाजरीचे प्रचंड नुकसान झाले आहे. रात्रीच्या पावसाने ज्वारी, गहू, हरभरा, उन्हाळी बाजरी या पिकांचे नुकसान झाले आहे. पिकावर केलेला खर्च देखील निघणार नाही त्यामुळे सरकारने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

  • 31 Mar 2026 09:08 AM (IST)

    पावसात भिजून कांदा खराब, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

    चाकण बाजार समितीत विक्रीसाठी आणलेला कांदा अचानक झालेल्या पावसामुळे भिजून खराब झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आधीच कांद्याला समाधानकारक भाव मिळत नसताना आता बाजार समितीच्या गलथान कारभारामुळे हा फटका अधिकच तीव्र झालाय.बाजार समितीत आवश्यक सुविधा आणि पावसापासून संरक्षणाची योग्य व्यवस्था नसल्याने कांद्याच्या ढिगांवर थेट पावसाचं पाणी पडल्याचं चित्र पाहायला मिळालं.

  • 31 Mar 2026 08:56 AM (IST)

    मुंबई- टॅरो रीडिंगच्या नावाखाली महिलेची फसवणूक; पाच पुरुषांसह महिलांना अटक

    मुंबईच्या आरे कॉलनी पोलिसांनी टॅरो रीडिंगच्या नावाखाली एका महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी पाच पुरुष आणि महिलांना अटक केली आहे. आरोपींनी महिलेला व्हिला नंबर 415, रॉयल पाम, आरे कॉलनी इथं बोलावलं आणि ड्रग्जच्या, वेश्या व्यवसायाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भिती दाखवून दोन लाख रुपये देण्यास भाग पाडलं.

  • 31 Mar 2026 08:46 AM (IST)

    भोंदू बाबा अशोक खरातच्या ऑफिसची फॉरेन्सिक तपासणी

    नाशिक- उद्या भोंदू बाबा अशोक खरातची पोलीस कोठडी संपणार आहे. तत्पूर्वी खरातच्या ऑफिसची फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली. पोलिसांकडून सील केलेल्या ठिकाणी पुराव्यांचा शोध घेण्यात आला. फॉरेन्सिक टीमने भक्तांची नोंद असलेली वही जप्त केली. काळे पडलेले पेढे, काळ्या रंगांची फळे आणि संशयास्पद यंत्रे ताब्यात घेतली. पीडित महिलेला घटनास्थळी नेऊन क्राइम सीन रीक्रिएट करण्यात आला. कथित शोषण झालेल्या केबिनची सखोल तपासणी करण्यात आली.

  • 31 Mar 2026 08:36 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्व रुग्णालयांचे पुन्हा फायर ऑडिट होणार

    छत्रपती संभाजीनगर शहरातील सर्व रुग्णालयांचे पुन्हा एकदा फायर ऑडिट होणार आहे. गजानन हॉस्पिटलमध्ये लागलेल्या भीषण आगीच्या घटनेनंतर महानगरपालिका प्रशासन आता सतर्क झाले आहे. या घटनेची गंभीर दखल घेत शहरातील सर्व रुग्णालयांमध्ये सुरक्षा तपासणी मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही मोहीम तातडीने हाती घेतली जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

  • 31 Mar 2026 08:26 AM (IST)

    तुळजापुरात दर्शनाच्या नावाखाली अल्पवयीन मुलांकडून भाविकांची लूट

    महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची अल्पवयीन मुलांकडून लूट केली जात असल्याचं समोर आलंय. मंदिरामध्ये सोडतो असं म्हणत अल्पवयीन मुलं बाहेरच्या भाविकांकडून पैसे घेत असल्याची माहिती समोर आली आहे. भाविकांना अल्पवयीन मुलं पुजारी असल्याचं सांगत देवीच्या दर्शनाला डायरेक्ट घेऊन जातो असं सांगून फसवणूक करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी हा सगळा प्रकार निदर्शनास आणून दिल्यानंतर त्याचं चित्रीकरण केलं असता त्यात लहान मुलं, वयोवृद्ध भाविकांना दर्शनाला सोडतो असं सांगत पैशाचा व्यवहार देखील करत असल्याचं समोर आलं आहे.

  • 31 Mar 2026 08:16 AM (IST)

    अमरावती जिल्ह्यातील अनेक तालुक्यात अवकाळी पावसाच्या सरी

    अमरावती जिल्ह्यातील अनेक तालुक्यात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोकळ्या जागेत असलेला शेतमाल भिजला आहे. सोयाबीन, तूर, गहूसह चना असलेले शेतमालाचे पोते पावसामुळे भिजले आहेत. पावसामुळे शेतमाल भिजल्याने शेतमाल खराब होण्याची शक्यता आहे.

  • 31 Mar 2026 08:06 AM (IST)

    भाजप खासदार निशिकांत दुबे यांना नाशिक न्यायालयाची नोटीस

    नाशिक- भाजप खासदार निशिकांत दुबे यांना नाशिक न्यायालयाने नोटीस बजावत ७ एप्रिल रोजी नाशिक न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. मराठी भाषिकांबाबत केलेल्या वक्तव्यावरून प्रकरण तापलं असून मनसे शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी मानहानीचा दावा दाखल केला होता. याआधी नोटीस बजावूनही उत्तर न दिल्याने न्यायालयाने पुढील आदेश दिला आहे. पोलिसांकडून न्यायालयात अहवाल सादर करण्यात आला आहे.

  • 31 Mar 2026 08:03 AM (IST)

    कल्याणचा ‘रील स्टार’ सुरेंद्र पाटील पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात

    कल्याणचा ‘रील स्टार’ सुरेंद्र पाटील पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. बलात्कार प्रकरणातून जामिनावर बाहेर येताच अवैध शस्त्रसाठ्यासह त्याला पुन्हा अटक करण्यात आली. पोलिसांनी घरातून 7 पिस्तूल, 370 जिवंत काडतुसे, तलवार-चॉपरचा मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. चपलांच्या स्टॅन्डमध्ये गुप्त कप्पा बनवून त्यात शिताफीने शस्त्र लपवले होते.

  • 31 Mar 2026 08:02 AM (IST)

    शिर्डीत येणाऱ्या इंडिगो विमानाचं सूरत विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग

    शिर्डीत येणाऱ्या इंडिगो विमानाचं सूरत विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. इंडिगोचं IGO 619Y हे विमान दिल्लीहून शिर्डीकडे येत होतं. मात्र खराब हवामान आणि कमी दृश्यमानतेमुळे शिर्डी विमानतळावर त्याचं लँडिंग शक्य झालं नाही. यानंतर विमानाला येवला आणि वैजापूर परिसरात हवेतच होल्डवर ठेवण्यात आलं. विमान खूप खाली उडत असल्यामुळे स्थानिक घाबरले होते. बराच वेळ हवेत घिरट्या घातल्यानंतरही हवामानात सुधारणा न झाल्याने आणि इंधनाचा विचार करून पायलटने विमान सूरतला वळवलं. इंधन भरल्यानंतर रात्री उशिरा 11 वाजता विमान पुन्हा शिर्डीकडे रवाना झालं.

  • 31 Mar 2026 08:00 AM (IST)

    एकनाथ शिंदे हे आमदार दीपक केसरकर यांच्यासह पक्षातील दोन मंत्र्यांवर नाराज- सूत्र

    एकनाथ शिंदे हे आमदार दीपक केसरकर यांच्यासह पक्षातील दोन मंत्र्यांवर नाराज असल्याची चर्चा आहे. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे दीपक केसरकर यांच्यावर होत असलेले आरोप आणि काही जिल्ह्यांत पक्षाची घटलेली ताकद यामुळे शिंदे नाराज असल्याचे म्हटलं जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आगामी काळात मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात असून काही मंत्र्यांची जबाबदारी बदलली जाऊ शकते.

उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे हे आमदार दीपक केसरकर यांच्यासह पक्षातील दोन मंत्र्यांवर नाराज असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे दीपक केसरकर यांच्यावर होत असलेले आरोप आणि काही जिल्ह्यांत पक्षाची घटलेली ताकद यामुळे शिंदे नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणूक 2026 मध्ये अपेक्षेप्रमाणे निकाल न लागल्याने शिंदे यांनी अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. याआधी लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीतही पक्षाच्या काही नेत्यांची कामगिरी समाधानकारक नसल्याचं समोर आलं होतं. सूत्रांच्या माहितीनुसार, आगामी काळात मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात असून काही मंत्र्यांची जबाबदारी बदलली जाऊ शकते. यासह राज्यातील इतर घडामोडी, देश-विदेश, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.

Published On - Mar 31,2026 7:56 AM

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...