10 जूनपर्यंत…राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाचे संकेत, आता सुप्रिया सुळेंचीही सूचक प्रतिक्रिया, म्हणाल्या हा निर्णय फक्त…
अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणावर केलेल्या विधानानंतर आता सुप्रिया सुळे यांनीदेखील महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

Supriya Sule : अजित पवार गट आणि शरद पवार गट अर्थात दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाच्या चर्चांना सध्या चांगलीच हवा मिळालेली आहे. दोन्ही पक्षातील नेते थेट आणि उघडपणे एकत्र येण्याबाबत विधानं करताना दिसत आहेत. दोन्ही पक्षांनी एकत्र आलं पाहिजे. थोरले आणि धाकले पवार एकत्र आले तर त्यात आक्षेप घेण्याचं काहीही कारण नाही, अशा प्रतिक्रिया दोन्ही पक्षातील नेत्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत. असे असतानाच अजित पवार यांच्या पक्षाचे प्रवक्ते अमोल मिटकरीय यांनी आषाढी एकादशीपर्यंत वाट पाहा, असं मोठं विधान केलं आहे. त्यांच्या याच विधानावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सर्व निर्णय लोकशाही पद्धतीनेच होतील
खासदार सुप्रिया सुळे यांनी अमोल मिटकरी यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. कोणताही निर्णय घेण्याआधी पक्षातील शेवटच्या कार्यकर्त्याला विश्वासात घेतले जाईल. सर्व प्रकारचे निर्णय हे लोकशाही पद्धतीनेच होतील, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय.
पक्षातील शेवटच्या कार्यकर्त्याला विश्वासात घेऊनच…
हा फक्त माझाच निर्णय नाही. याबाबत पक्षातर्फे निर्णय घेतला जाईल. गेल्या सहा दशकांपासून महाराष्ट्राने शरद पवार यांच्या कामाची पद्धत पाहिलेली आहे. शरद पवार जो निर्णय घेतात किंवा जे मार्गदर्शन करतात ते लोकशाही पद्धतीनेच होते. त्यामुळेच पक्षाचा जो काही निर्णय असेल तो पक्षातील शेवटच्या कार्यकर्त्याला विश्वासात घेऊनच घेतला जाईल. कोणताही निर्णय आम्ही आतापर्यंत एकाधिकारशाहीने घेतलेला नाही. यापुढेही कोणताही एकर्तफी निर्णय होणार नाही, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं आहे.
अमोल मिटकरी नेमकं काय म्हणाले होते?
अजित पवार गटाचे आमदार तथा प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणावर भाष्य केलं आहे. एकत्रिकरणाचा अद्याप कोणताही प्रस्ताव नाही. पण पांडुरंगाची इच्छा असली तर आषाढी-एकादशीपर्यंत काहीतरी होईल, अशी अपेक्षा मिटकरी यांनी व्यक्त केली. तसेच येणाऱ्या 10 जून रोजी पुण्यात पक्षाचा मेळावा होणार आहे. त्यामुळे 10 तारखेपर्यंत सर्वांना वाट पाहावी, असे सूचक विधानही त्यांनी केले आहे.
शेवटी शरद पवार हे….
सध्या कोणतीही चर्चा नाही. दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याबाबत कोणाचाही विरोध नाही. आमच्या पक्षाकडून तसा विरोध आहे, अशा बातम्या चालल्या. पण आमच्या पक्षाचा कोणताही विरोध नाही. शेवटी शरद पवार हे ज्येष्ठ नेते, मार्गदर्शक आहेत. शरद पवार तसेच अजित पवार आम्हाला जो काही आदेश देतील, तो आदेश शिरसावंद्य समजून आम्ही पुढे जाऊ, अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली आहे.
खरंच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का?
आम्ही वारकरी संप्रदायाचे आहे. आषाढी एकादशीचाच मुहूर्त कशाला हवा. कोणताही मुहूर्त असू शकतो असे सांगत मिटकरी यांनी सध्यातरी एकत्रिकरणाचा असा कोणताही प्रस्ताव नाही, असेही मिटकरी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता येणाऱ्या काही काळात नेमकं काय घडणार? खरंच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
