ना कोणाशी चर्चा, ना भेट; मग दोन दिवसात मनसेला रामराम कसा? संतोष धुरींनी सांगितली मन की बात
मनसेचे फायरब्रँड नेते संतोष धुरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नितेश राणे यांच्या पुढाकाराने झालेली ही भेट आणि धुरींनी मनसे सोडण्याबाबत दिलेले संकेत याबद्दल सविस्तर जाणून घ्या

मनसेचे फायरब्रँड नेते संतोष धुरी यांनी मनसे पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचे संकेत दिले आहेत. संतोष धुरी यांनी नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यामुळे ते लवकरच भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याचे बोललं जात आहे. आता संतोष धुरी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मन की बात माध्यमांसमोर मांडली आहे. यावेळी त्यांनी कोणत्याही अटी-शर्थीशिवाय आणि कोणाशीही चर्चा न करता केवळ दोन दिवसांत हा निर्णय घेतल्याचे जाहीरपणे सांगितले. त्यामुळे मनसेला मोठा धक्का बसला आहे.
संतोष धुरी काय म्हणाले?
मी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. माझ्यासोबत नितेश राणे होते. मला तिथे जाऊन बरं वाटलं. मला त्यांनी तात्काळ भेट दिली. त्यामुळे मला बरं वाटलं. त्यांनी माझी कदर केली. मला बंगल्यावर बोलवून घेतलं. नितेश राणे यांनी परवा मला संपर्क केला. ते सिंधुदुर्गावरुन माझ्यासाठी मुंबईत आले. ते रात्री आले. परत सकाळी निघून गेले. त्यांना माझ्यात काहीतरी वाटलं असेल. माझ्याबद्दल चांगलं वाटलं असेल. त्या कारणास्तव ते इथे आले, मला भेटले आणि नंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊया असे म्हटले. त्यानंतर त्यांनी सदिच्छा भेट घेतली. अर्धा तास आम्ही चर्चा केली. मला बरं वाटलं. माझी राजकीय भूमिका ही मी दुपारनंतर स्पष्ट करेन. तिकीट वैगरे हा विषय नाही. मी माझी राजकीय भूमिका दुपारनंतर नक्की कळवेन. मला थोडा वेळ द्या, असे संतोष धुरी यांनी सांगितले.
आजही कोणत्याही अटीवर जाणं मला पटत नाही
मला तिथे गेल्यावर चागलं वाटलं. नितेश राणे हे कोकणातले आहेत. ते आमच्या नेहमी संपर्कात असायचे. काहीही काम असली ते आम्हाला भेटायचे. आमच्याशी चर्चा करायचे. मदत करायचे. आता ते स्वत: सिंधुदुर्गातून प्रवास करुन इथे आले तर मला बरं वाटलं. त्या दुसऱ्या दिवशी काम होतं तरीही ते इथे येऊन मला भेटले. ही केवळ सदिच्छा भेट होती, यात तिकीट किंवा इतर कोणत्याही अटींचा विषय नव्हता. मी राज ठाकरेंसोबत असतानाही कधी अटी घातल्या नव्हत्या आणि आजही कोणत्याही अटीवर जाणं मला पटत नाही, असे संतोष धुरी यांनी म्हटले.
माझ्याशी पक्षातील कोणीही संपर्क साधला नाही. संदीप देशपांडे असोत की राज ठाकरे, कोणाचंही माझ्याशी बोलणं झालं नाही. मी माझा निर्णय स्वतः घेतला आहे. संदीप देशपांडे आणि माझी मैत्री नक्कीच राहील, पण आता त्यांनी ती ठेवली तरच ती टिकेल. मी नेहमीप्रमाणे इथे आलो. ते मला भेटले. मित्र म्हणून मला ते भेटले. मी कोणाशीही चर्चा केली नाही. मी हा निर्णय दोन दिवसात घेतला आणि प्रवेश करण्याचे ठरवले. मला प्रवेश करायला उशीर झाला असे वाटत नाही. प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते, त्याप्रमाणे मी हा निर्णय घेतलेला आहे, असे संतोष धुरी म्हणाले.
