“जर कोणात खुमखुमी असेल तर…”, प्रताप पाटील चिखलीकर यांचा अशोक चव्हाणांना थेट इशारा, नांदेडमध्ये महायुतीतच लाथाळ्या
Nanded Mahayuti Fight : नांदेडमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपासून राजकारणाने कूस बदलली आहे. मित्र शत्रू झाले तर शत्रू हे मित्र झाले आहेत. स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वीच जिल्ह्यात स्वबळावरून कलगीतूरा रंगला आहे.

नांदेड जिल्ह्यातील राजकारणाने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अनेकदा कूस बदलली. अनेक धक्के पचवले. आता येथील नेते काँग्रेस, भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी अशा सर्वच पक्षाशी जवळीक ठेवून आहेत. पण नेत्यांमध्ये एकवाक्यता नाही. खासदारकी, आमदारकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत येथे महायुतीत लाथाळ्या दिसून येत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपाची तोंड विरुद्ध दिशेला आहेत.
खुमखुमी असेल तर
काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले नेते अशोक चव्हाण यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेत स्वबळाची भाषा केल्यानंतर आता महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यावर सडकून टीका केली आहे. अजित पवार गटाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांना डिवचले आहे.




अशोक चव्हाण यांच्या हातात राज्याच काहीच नाही, राज्याचे नेते जे सांगतील ते अशोक चव्हाण यांच्या सहित मलाही ऐकावं लागणार आहे. मी महायुतीचा धर्म पाळणारा आहे, जर स्वबळाचा नारा कोणी दिला असेल, कुणात खुमखुमी असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस तयार आहे, असा इशारा चिखलीकर यांनी चव्हाण यांना दिला आहे. महायुतीचा धर्म पाळून आम्ही काम करणार आहोत. पण कुणाला स्वतंत्र लढायचं असेल तर आम्ही पण तयार आहोत, असे आव्हान त्यांनी दिले आहे.
राष्ट्रवादी जिल्ह्यात सक्षम
नांदेडमध्ये राष्ट्रवादी पेक्षा भाजपाची ताकद जास्त आहे. भाजपा हा मोठा पक्ष आहे हे मान्य कराव लागेल मात्र अजित दादाच्या नेतृत्वाखाली 41 आमदार महाराष्ट्राने निवडून दिले आहेत. एखाद्या मतदारसंघात ताकद कमी आहे किंवा एखाद्या मतदारसंघात ताकद जास्त आहे असा विषय नाही महायुती जो निर्णय घेईल त्यानुसार चालावा लागेल. विधानसभा सदस्यांची संख्या जरी कमी असले तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था राष्ट्रवादी ताब्यात घेण्यास सक्षम आहे, असे चिखलीकर म्हणाले. हेमंत पाटलांनी स्वबळाचा नारा दिला नाही ते असं म्हटले कुणी जर स्वतंत्र लढू इच्छित असेल तर आम्ही सुद्धा कमी नाही ते बरोबर बोलले. एखाद्या पक्षाने महायुतीचा धर्म पाळला नाही तर ज्याचं त्याला रान मोकळं आहे, असे सांगायला चिखलीकर विसरले नाहीत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मतदारांचे आभार मानण्यासाठी महाराष्ट्रभर फिरत आहेत. हिंदुस्थानातील पहिला नेता असेल जो निवडणुका झाल्यानंतर स्वत:हून मतदाराच्या दारात जाऊन आभार मानत आहेत, असे शिवसेनेचे विधान परिषद आमदार हेमंत पाटील म्हणाले. 6 फेब्रुवारीला भव्य आभार सभा होणार आहे किमान 50 हजार नागरिक या सभेला उपस्थित राहतील, असे ते म्हणाले.
अशोक चव्हाण यांची केली तक्रार
देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. अशोक चव्हाण यांच्या वक्तव्या बाबत तक्रार केली, असे हेमंत पाटील यांनी सांगितले. जेव्हा आमच्या निवडणुका असतात तेव्हा आम्ही युती करतो, आघाड्या करतो मात्र कार्यकर्त्याच्या निवडणुकीच्या वेळेस स्वबळाची भाषा करतो यामुळे कार्यकर्त्यांमध्ये फूट पडते. – नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांचे विरोधात मिलिंद देशमुख यांनी निवडणूक लढवली आणि पुन्हा त्यांना भाजप पक्षात घेतलं. युती म्हणून आपण एकत्र असताना विरोधात निवडणूक लढवणार आला महिनाभरात पक्षात घेता नेमकं काय समजायचं ? मित्र म्हणून गळ्यात हात टाकायचा आणि पाठीमागून सुरी खुपसायच हे धंदे कुठेतरी बंद झाले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
चव्हाणांवर खरमरीत टीका
युती म्हणून एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुलीसाठी सभा घेतल्या त्यावेळेस तुम्हाला युती पाहिजे. आता महानगरपालिका आली छोट्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आल्या त्यावेळेस तुम्ही युती तोडणार हे काय बरोबर नाही. देवेंद्र फडणवीस यांना आम्ही भेटलो. त्यांच्याकडे तक्रार केली.