Maharashtra Breaking News LIVE 9 March 2025 : कुंभमेळा स्नान अंधश्रद्धा नाही तर धार्मिक परंपरा…गिरीश महाजन
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 9 मार्च 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. यात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. त्यातच आता मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामतीमध्ये सर्वधर्मीय मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे. बारामतीतील कसबा चौक ते भिगवण चौकापर्यंत हा निषेध मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चात संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आणि कन्या वैभवी देशमुख सहभागी होणार आहे. तर दुसरीकडे आज मनसेचा १९ वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने राज ठाकरे चिंचवडमधील सभागृहात मनसे कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत. तसेच शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसेनेचे आज ईशान्य मुंबईत निर्धार शिबीर होणार आहे. या शिबीराला ठाकरे गटाचे कार्यकर्ते सहभागी असतील. या शिबीराला उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत. तसेच उद्या राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पापूर्वी आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. यासह महाराष्ट्र, देश-विदेश, मनोरंजन, क्रीडा सह सर्वत क्षेत्रातील महत्वाच्या अपडेट्स वाचण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
LIVE NEWS & UPDATES
-
धनंजय देशमुख बारामतीमध्ये
संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आज बारामतीमध्ये आले. यावेळी त्यांनी आपण बारामतीला न्याय मागण्यासाठी आलो असल्याचे सांगितले. अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री देखील आहेत.आमची त्यांना आवाहन आहे की त्यांनी कोणत्याही आमदाराला पाठीशी घालू नये, असे धनंजय देशमुख यांनी म्हटले.
-
तलावात हजारो मृत मासे
तारापूरजवळील कुडन येथे तलावात हजारो मृत माशांचा खच आढळून आला. कुडनच्या माळी स्टॉप जवळील तलावात मृत माशांचा खच पडला आहे. रात्रीच्या सुमारास केमिकल माफियांकडून तलावात केमिकल सोडल्याचा संशय आहे.
-
-
पुण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन
तरुणांना रोजगार मिळावा यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून पुण्यातल्या पुणे महानगरपालिका मेट्रो स्थानकामधील मेट्रो ट्रॅकवर उतरून आंदोलन करण्यात आले . या आंदोलनामुळेच तासभर मेट्रो सेवा खोळंबली.
-
कुंभमेळा धार्मिक परंपरा
कुंभमेळा स्नान करणे ही अंधश्रद्धा नाही तर आपली धार्मिक परंपरा आहे. नाशिकला होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन बोलत होते. गोदावरीत दूषित पाणी येत मात्र आम्ही पुरेपूर प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.
-
पुण्यात नंगानाच करणाऱ्या गौरव अहुजाला ७ दिवसांची पोलीस कोठडी द्या, पोलिसांची मागणी
पुण्यातील गौरव आहुजा याने सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्ये केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मद्यधुंद अवस्थेत असताना त्याने रस्त्यावर अश्लील वर्तन केले आणि लघुशंका केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याने माफी मागितली आहे. आता पोलिसांनी गौरव अहुजाला ७ दिवसांची पोलीस कोठडी द्या अशी मागणी केली.
-
-
जर दया मया केली तर सरकारवर संकट येईल; जरांगेंचा इशारा
छत्रपती संभाजीनगर येथे मनोज जरांगे पाटील यांनी नुकताच पत्रकार परिषद घेतली. यावेळी संतोष देशमुख प्रकरणावर वक्तव्य करत सरकारला इशारा दिला. ‘धमक्या देणे यांचे कामच होत, धनंजय मुंडे यानी अश्या टोळ्याच केलेल्या आहेत’ असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. पुढे त्यांनी, ‘कट कारस्थान त्याच्या कार्यालयावर झाले. सरकारने दया मया केली तर सरकारवर संकट येईल’ असे म्हटले.
-
कुंभामधून आणलेलं पाणी पिण्याला राज ठाकरेंचा विरोध; म्हणाले “अरे कोण पिणार ते पाणी…”
बाळा नांदगावकरांनी कुंभामधून आणलेल्या पाण्याबद्दल राज ठाकरेंनी नकार दिला होता. पण त्यांनी असं का केलं याबद्दल त्यांनी भाषणात सांगितलं आहे. राज ठाकरे म्हणाले की,” बाळा नांदगावकरांनी कुंभामधून प्यायला पाणी आणलं, मी त्यांना म्हटलं अजिबात नाही.कोण पिणार ते पाणी. आताच करोना गेला, त्याच्याशी कोणाला घेणं देणं नाही. तिकडे जाऊन सगळेच आंघोळ करतात. मी कित्येक स्विमिंग पूल पाहिलेत. आधी निळे होते. नंतर हिरवे झाले. कोण जाऊन पडेल त्यात. त्याने तिथे काही तरी केलं, ते मी इथे पिऊ का? श्रद्धेला काही अर्थ आहे की नाही?” असं म्हणत राज ठाकरेंनी या देशातील एकही नदी स्वच्छ नसल्याचं म्हटलं आहे.
-
कामात दिरंगाई आढळल्यास पदावरून काढणार; राज ठाकरेंची पदाधिकाऱ्याना थेट तंबी
आज चिंचवडमध्ये मनसेचा वर्धापन दिन आहे, त्यानिमित्ताने राज ठाकरेंनी सर्वांशी संवाद साधला. या संवादावेळी राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. ” इथून पुढे पक्षातील प्रत्येकाचं काम तपासलं जाणार. पक्ष संघटना मजबूत करण्याची गरज आहे. आपल्याला राजकीय फेरीवाले उभे करायचे नाहीयेत. कामात दिरंगाई आढळल्यास पदावरून काढणार” अशा कडक शब्दात राज ठाकरेंनी सर्वच पदाधिकाऱ्यांनी तंबी दिली आहे.
-
अर्जुन खोतकर यांनी घेतली बैठक
जालना विधानसभा मतदार संघातल्या 89 गावातील जलजीवन मिशन योजनेच्या संदर्भात आमदार अर्जुन खोतकर यांनी पंचायत समितीच्या सभागृहात आढावा बैठक घेतली.यावेळी विविध गावचे सरपंच उपस्थित होते.
-
सुरेश धस यांचा जनता दरबार
आष्टी येथे आमदार सुरेश धस यांचा जनता दरबार सुरू आहे. या जनता दरबारात नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. तर ज्यांना मोर्चा काढायचा, त्यांना मोर्चे काढू द्या अशी प्रतिक्रिया त्यांनी शिरूर येथील मोर्चाबाबत काढली.
-
आज सांगोला बंद
सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपींचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपीना तातडीने फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी आज सांगोला बंदची हाक देण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांच्या आमदारकीच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.
-
धनंजय मुंडे यांना सहआरोपी करा, युगेंद्र पवार यांची मागणी
धनंजय मुंडे जर दोषी असतील तर त्यांना सह आरोपी करा. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला मात्र त्याला तीन महिने का लागले? असा सवाल शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांनी विचारला. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामतीमध्ये सर्वधर्मीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
-
सतीश भोसलेला अटक करण्यासाठी आक्रोश मोर्चा
सतीश भोसले याला अटक करण्यासाठी शिरूर कासार पोलीस स्टेशनवर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात ढाकणे पित्रा-पूत्र हजर होते.
-
सरकारकडून लाडक्या बहिणींची फसवणूक
विधानसभा निवडणूक काळात महायुतीचे नेते लाडकी बहीण योजनेविषयी दावे करत होते. तर आम्ही ही फसवणूक असल्याचे सांगत होतो, असे खासदार संजय राऊत म्हणाले. 1500 रुपयांना बहिणींची मतं विकत घेतली आणि 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले. बहिणींनी मतं दिली पण सरकारकडे पैसे नाहीत, असे ते म्हणाले.
-
उद्धव ठाकरे सेनेचे निर्धार शिबिर
आज ठाकरे सेनेचे सकाळी 10 वाजेपासून रात्री 9 वाजेपर्यंत हे शिबिर चालणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. आदित्य ठाकरे या शिबिराचे उद्धघाटन करणार आहेत. तर उद्धव ठाकरे हे मार्गदर्शन करणार आहेत. संपूर्ण राज्यातील शिवसैनिकांसाठी अशा प्रकारचे शिबिरं आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
-
जालन्यात ट्रॅक्टर अंगावर पडून तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
जालन्यात ट्रॅक्टर अंगावर पडून तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. घनसावंगी तालुक्यातील देवी दहेगाव येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. रामेश्वर परमेश्वर शिंदे वय 44 वर्ष असे मृत झालेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. सध्या शेतातील कामं सुरू असून रामेश्वर शिंदे हे आपल्या शेतात ट्रॅक्टर घेऊन काम करण्यासाठी गेले होते. या दरम्यान ट्रॅक्टरचा हेड रामेश्वर यांच्यावर अंगावर अचानक पलटी झाला. यात रामेश्वर यांचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला.
-
लालबाग फ्लायओव्हर बनला मृत्यूचा सापळा
मुंबई:- मुंबईतील लालबाग फ्लाय ओव्हरवरील पॅचेसमुळे तो अपघाताचा ग्रस्त झाला आहे. फ्लायओव्हरवरून भरघाव वेगात जाणारे वाहन जम्प घेत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. लालबाग फ्लायओव्हर मृत्यूचा सापळा बनला असल्याचे समोर आले आहे. याबाबतच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच नागारिकांनी या पोस्टवर तीव्र संताप व्यक्त केला असून, 1.6 मिलियन व्ह्यूज आले आहेत.
कोस्टल रोडच्या ही अशाच प्रकारे पोस्ट होताच याची पंतप्रधान कार्यालयाने दाखल घेतली होती. तशीच दखल लालबाग फ्लाय ओव्हरचीही घ्यावी अशी मागणीही करण्यात येत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते 2011 मध्ये उदघाटन करण्यात आले होते. मात्र आता फ्लाय ओहर वरील पॅच मुळे हा फ्लाय ओहर मृत्यूचा सापळा बनला आहे. मात्र मुंबई महापालिकेने याबाबत सावध पवित्रा घेऊन संबंधित अधिकारी यांना सूचना दिल्या असल्याचेही सांगण्यात आले आहे.
-
संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ बारामतीत सर्वधर्मीय मोर्चा
बारामती : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामतीमध्ये सर्वधर्मीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. बारामतीतील कसबा चौक ते भिगवण चौकापर्यंत निषेध मोर्चा निघणार आहे. या मोर्चात संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आणि कन्या वैभवी देशमुख सहभागी होणार आहेत. या मोर्चात युगेंद्र पवार सहकुटुंब उपस्थित राहणार आहे. थोड्याच वेळात मोर्चाला सुरुवात होणार आहे.
Published On - Mar 09,2025 10:29 AM
