Maharashtra Breaking News LIVE 26 January 2025 :कार थांबवून जखमी तरुणाला रुग्णालयात नेलं;एकनाथ शिंदेंचा ‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन’ बाणा
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 26 जानेवारी 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनासाठी संपूर्ण देश सज्ज झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात दिल्लीत कर्तव्य पथावर लष्करी संचलन पार पडणार आहे.आज कर्तव्य पथावर होणाऱ्या विशेष कार्यक्रमासाठी इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन पुष्पहार अर्पण करतील. राज्यासह देशभरात ठिकठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे आज मुंबईतील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील वाहतूक ही उशिराने सुरु आहे. कर्नाक पुलावर गर्डर लाँचिंगसाठी घेतलेला ब्लॉक अद्याप रद्द न झाल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली आज धरणे आंदोलन होणार आहे. राज्यघटनेची काटेकोर अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी हे आंदोलन केले जाणार आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
अखिलेश यांनी केले महाकुंभात स्नान, म्हणाले…
महाकुंभात श्रद्धेने स्नान केल्यानंतर सपा प्रमुख अखिलेश यादव म्हणाले की, अधिक चांगली व्यवस्था करता आली असती. पूर्वीच्या सरकारांनीही कुंभसाठी उत्तम व्यवस्था केली होती. सौहार्द, सुसंवाद आणि सहिष्णुता कायम राहिली पाहिजे. ते पुढे म्हणाले की, भाजपने गंगा मातेच्या पवित्रतेची आपली प्रतिज्ञा पूर्ण करावी. आजही अनेक नाले गंगा नदीत पडत आहेत.
-
सैफ अली खान प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांचे पथक पश्चिम बंगालमध्ये पोहोचले
अभिनेता सैफ अली खानवर हल्ला प्रकरण: अभिनेता सैफ अली खानच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांचे दोन सदस्यीय पथक पश्चिम बंगालला पोहोचले आहे. मुंबई पोलिसांचे म्हणणे आहे की अटक आरोपींनी सिमकार्ड खरेदी करण्यासाठी पश्चिम बंगालमधील एका व्यक्तीचे आधार कार्ड वापरले.
-
-
दिल्लीत हाय अलर्ट दरम्यान बॅगेत महिलेचा मृतदेह सापडला
26 जानेवारीला दिल्लीत हाय अलर्ट असताना गाझीपूर भागात एका महिलेचा मृतदेह एका बॅगेत सापडला होता. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेची हत्या केल्यानंतर आरोपींनी मृतदेह एका बॅगेत टाकला. त्यानंतर आरोपींनी बॅग पेटवून दिली आणि तेथून पळ काढला. पोलिसांनी फरार आरोपींचा शोध सुरू केला आहे.
-
ट्रम्प यांनी बांगलादेशला अमेरिकन मदतीवर बंदी घातली
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बांगलादेशला मोठा धक्का दिला आहे. त्यांनी बांगलादेशला अमेरिकन मदत ताबडतोब थांबवली आहे.
-
कार थांबवून जखमी तरुणाला रुग्णालयात नेलं; एकनाथ शिंदेंचा ‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन’ बाणा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कायमच गरजूच्या मदतीला धावून जातात. त्यांच्या या संवेदनशीलपणाचा प्रत्यय अनेकदा पहायला मिळाला आहे. मात्र आज प्रजासत्ताक दिनी त्यांचा डिसीएम म्हणजेच ‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन’ वाला बाणा पुन्हा एकदा मुंबईकरांना पहायला मिळाला.
प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाणे येथील साकेत मैदानात आयोजित केलेल्या ध्वजवंदन आणि संचलन सोहळा पार पडल्यानंतर मुंबईतील वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या दुसऱ्या मार्गिकेच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री शिंदे हे ठाण्याकडून मुंबईला जायला निघाले. शिंदे यांचा ताफा पूर्व द्रुतगती महामार्गावरून घाटकोपर जवळ आला असताना अचानक त्यांना एका दुचाकीचा अपघात होऊन तरुण जखमी झाल्याचं दिसलं.
तत्काळ त्यांनी आपला ताफा रस्त्याच्या बाजूला घेत गाडीतून उतरून या तरुणाची विचारपूस केली. दुचाकीवरून पडल्याने या तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांनी तत्काळ इतर तरुणांच्या साथीने त्याला उचलून रुग्णालयात न्यायला सांगितलं. एवढेच नाही तर आपल्या ताफ्यातील गाडी आणि पोलिस सोबत देऊन या तरुणाला राजावाडी रुग्णालयात दाखल करायला सांगितले. तसेच गाडीत बसलेल्या तरुणाला ‘तू सुखरूप आहेस काळजी करू नकोस, आपण तुला पूर्ण बरे करू’ असे सांगून आधारही दिला.
-
-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय बाबुराव चांदेरेंच्या विरोधात गुन्हा दाखल; मारहाण केल्याचा आरोप
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय बाबुराव चांदेरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चांदेरे यांनी विजय रौंदळ या नागरिकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. जमिनीच्या वादातून चांदेरे यांनी विजय यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. या मारहाणीत विजय रौंधळ यांच्या डोक्याला व गुडघ्याला जखम झाली. पुण्यातील बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वी चांदेरे यांनी अशाच पद्धतीने रिक्षा चालकाला मारहाण केली होती.
-
अर्नाळा सागरी पोलीसांचे जुली बेटाजवळ ध्वजसंचलन
अर्नाळा सागरी पोसिसांनी जुली बेटाजवळ धव्जसंचलन केले आहे. हा विशेष क्षण ड्रोन कॅमेऱ्याद्वारे टिपण्यात आला आहे.
-
आणीबाणीचं समर्थन करणं म्हणजे स्वतःचं भविष्य अंधकारमय करणं – सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर : सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून इमर्जन्सी चित्रपटावर करण्यात आलेल्या टीकेवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
इंदिरा गांधींचं कौतुक करून आणीबाणी मध्ये शिवसेनेच्या नेत्यांनी स्वतःची जेलवारी वाचवली होती. शिवसेनेची तेव्हाची भूमिका ही स्वतःची चमडी वाचवणारी होती म्हणून त्यांना आज आणीबाणीचा समर्थन करावं लागतं. आणीबाणीचं समर्थन करणं म्हणजे स्वतःचं भविष्य अंधकारमय करणं आहे, असं ते म्हणाले.
-
10-15 टक्के भाडेवाढ प्रवाशांनी सहन करावी – गुलाबराव पाटील
महाराष्ट्र मध्ये जर 5000 नवीन बसेस येत आहेत. त्यामुळे दहा- पंधरा टक्के भाडेवाढ प्रवाशांनी सहन करावी अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी एसटीच्या झालेल्या 15 टक्के भाडेवाढीबद्दल दिली आहे.
लक्झरी बसेस बरोबर आपल्याला जर स्पर्धा करायचा असेल, आपल्याला जर सुविधा पाहिजे असतील, ई बसेस आणायचे असतील तर थोडासा भार हा सहन करावा लागेल.
-
एनसीसीच्या विद्यार्थ्यांकडून कर्तव्यपथावर संचलन
एनसीसीच्या विद्यार्थ्यांकडून कर्तव्यपथावर संचलन करण्यात आलं. बीएसएफच्या उंट पथकाचीही परेड पार पार पडली.
#RepublicDay🇮🇳: Camel Contingent of the BSF followed by Camel Mounted Band of the BSF and NCC Contingent during the 76th #RepublicDay Parade on Kartavya Path, in Delhi
(Source: DD News) pic.twitter.com/8YaKFrXtJz
— ANI (@ANI) January 26, 2025
-
सागरी किनारा प्रकल्प वांद्रे – वरळी सागरी सेतूला जोडणाऱ्या पुलाचं उद्घाटन
धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई सागरी किनारा प्रकल्प वांद्रे – वरळी सागरी सेतूला जोडणाऱ्या पुलाचं थोड्याच वेळात उद्घाटन होणार आहे. उद्घाटनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार विंटेज कार मध्ये बसून प्रवास करणार आहेत.
-
कोल्हापूरच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन
कोल्हापूरच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आलं. छत्रपती शाहू महाराज मैदानात मांडला कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला आहे. पालकमंत्र्यांनी आपलं म्हणणं ऐकून घेण्यासाठी मैदानात हा ठिय्या मांडण्यात आलाय. पोलीस आणि आंदोलक यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्यात यावी यासाठी मैदानात ठिय्या मांडला आहे.
-
मुंबई – नाशिक महामार्गावर कसारा घाटात चिंतामणवाडीजवळ मिनी बसचा अपघात
मुंबई – नाशिक महामार्गावर कसारा घाटात चिंतामणवाडीजवळ एका खाजगी मिनी बसच्या चालकाचा ताबा सुटल्याने ही बस महामार्गावर पलटी होऊ अपघात झाला. या अपघातात 3 जण गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. तर 21 जण किरकोळ जखमी झालेत.
-
देश प्रगती करत आहे, विश्वात देशाचा गौरव होत आहे- मोहन भागवत
“देश प्रगती करत आहे. विश्वात देशाचा गौरव होत आहे. हा सन्मान फक्त आणि फक्त देशातील सजग नागरिकांमुळे शक्य होत आहे. या संस्थेचे संस्थापक अण्णासाहेब जाधव यांनी त्यागपूर्वक समाजासाठी कार्य केलं. देशासाठी अनेकांनी त्याग केला. आज आपण आपलं कर्तव्य आणि जबाबदारी यांची जाणीव ठेवली पाहिजे. समाजाचे सहयोग घेऊन समाजासाठी कार्य करणे हाच खरा धर्म आहे,” असं सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.
-
GBS आजारावर पुणे महानगर पालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात मोफत उपचार केले जाणार
पुणे- GBS आजारावर पुणे महानगर पालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात मोफत उपचार केले जाणार आहेत. GBS चे पुण्यात 74 रुग्ण आहेत. त्यापैकी 14 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत तर पाच रुग्णांना आज डिस्चार्ज मिळणार आहे. 50 बेड तर 15 आयसीयू कमला नेहरू रुग्णालयात आरक्षित करण्यात आले आहेत. पुणे महापालिका आयुक्त सर्व आरोग्य विभागाची थोडा वेळात बैठक घेणार आहे.
-
जालन्यात 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न
जालन्यात 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न झालं.
माजी मंत्री बबनराव लोणीकर, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण नाथ पांचाळ पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
-
पुण्यातील GBS बाधित रुग्णाचा मृत्यू
पुण्यातील DSK विश्व मध्ये राहणाऱ्या तरुणाचा GBS ची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे. मूळचा सोलापूर जिल्ह्यातील असणारा तरुण पुण्यातील धायरी परिसरात असणाऱ्या डीएसके विश्व या ठिकाणी वास्तव्यास होता. काही दिवसांपूर्वीच या तरुणाला पुण्यात GBS या आजाराची लागण झाली होती.
-
परभणी – पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते 76 व्या ध्वजारोहण संपन्न
परभणी – पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते 76 व्या ध्वजारोहण संपन्न. प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा संकुल येथे मुख्य ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. पोलीस दलाकडून मानवंदना देण्यात आली.
-
धाराशिव जिल्ह्याला मिळणार नव्या कोऱ्या 50 बस
धाराशिव जिल्ह्याला आता नव्या कोऱ्या 50 बस देण्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री धाराशिवचे पालक प्रताप सरनाईक यांनी केली आहे. प्रताप सरनाईक यांची धाराशिव जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्यानंतर ते पहिल्यांदाच धाराशिव दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी ही घोषणा केली आहे. त्याआधी धाराशिव येथील आगारात जाऊन त्यांनी नवीन दोन बसचे पूजन देखील केलं.
-
पेन्शनची रक्कम वाढवून द्या, प्रहार अपंग संघटनेकडून पुण्यात आंदोलन
पुणे : प्रजासत्ताक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पोलीस ग्राउंडवर ध्वजारोहण करण्यात येणार आहे. अपंग व्यक्तींना दीड हजार पेशन्स मिळते. मात्र ती वाढवून 6000 रुपये मिळावी यासाठी आंदोलन सुरु आहे. प्रहार अपंग संघटनेकडून आंदोलन करण्यात येते आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार येण्यापूर्वी आंदोलन सुरू झाले आहे. प्रहार अपंग संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. अजित पवार ज्या रस्त्याने येणार आहेत, त्या रस्त्यावर हे आंदोलन सुरू आहे. यावेळी काही अनुचित प्रकार पडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळत आहे.
-
आज सकाळी ९.३० वाजता सुरु होणार प्रजासत्ताक दिनाचा सोहळा
आज सकाळी ९.३० वाजता प्रजासत्ताक दिनाचा सोहळा सुरु होणार आहे. इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो हे यंदाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. यानंतर १० वाजेपर्यंत तिन्ही लष्कराचे प्रमुख आणि सरंक्षण मंत्री नॅशनल वॉर मेमोरिअलमध्ये येणार आहेत.
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून देशवासियांना शुभेच्छा
Greetings to everyone on Republic Day! Today, let us reaffirm our commitment to the ideals of our Constitution and the values that bind us as the world’s largest democracy. देशाची एकात्मता अबाधित राहण्यासाठी संविधानाचे रक्षण करूया, जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा उत्सव साजरा… pic.twitter.com/OuLKW8yyrz
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 26, 2025
-
देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी ध्वजावंदन
आज प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी ध्वजावंदन करण्यात आले. देवेंद् फडणवीस यांच्या हस्ते ध्वजावंदन सोहळा पार पडला
-
राज्यघटनेची काटेकोर अंमलबजावणी करा, सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांचे आज धरणे आंदोलन
टिळक पुतळ्यासमोर आज धरणे आंदोलन.
राज्यघटनेची काटेकोर अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सवपूर्ती दिनी रविवारी (२६ जानेवारी) ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन होणार आहे.
सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ असे ब्रिटिशांना सुनावणाऱ्या लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यासमोर सकाळी साडे दहा वाजता राष्ट्रीय एकात्मता समितीचे कार्यकर्ते ‘भारतीय संविधान’ या ग्रंथासह आंदोलनात सहभागी होणार आहेत. भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी २६ जानेवारी १९५० पासून सुरू झाली. त्याची आठवण ठेवण्यासाठी दर वर्षी २६ जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून आनंदाने साजरा करतो. यंदाच्या २६ जानेवारीला त्याला ७५ वर्षे पूर्ण होतील. मात्र, सध्या प्रजासत्ताक हे संबोधनापुरते राहिले आहे,’ अशी खंत व्यक्त करून डॉ. आढाव यांनी धरणे आंदोलनामागची भूमिका स्पष्ट केली.
-
राज्यातील चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर
विशेष सेवेसाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्यासह राज्यातील चार अधिकाऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती पदक जाहीर झाले. बिनतारी संदेश विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहातील अतिरिक्त अधीक्षक विवेक झेंडे, कारागृह विभागातील उपअधीक्षक सुनील तांबे, सांगली जिल्हा कारागृहातील हवालदार अहमद शमसुद्दीन मनेर, तुळशीराम गोरवे, येरवडा मध्यवर्ती कारागृहातील हवालदार गणेश गायकवाड, दौलतराव जाधव, तुरुंगाधिकारी प्रशिक्षण महाविद्यालयातील हवालदार प्रल्हाद कुदळे, पुणे लोहमार्ग पोलिस दलातील आनंद जंगम यांच्यासह राज्यातील ३९ अधिकाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर करण्यात आले.
-
विश्व संमेलनासाठीची रक्कम प्रोत्साहनपर, उदय सामंत यांचा दावा
पुण्यात होत असलेल्या विश्व मराठी संमेलनास उपस्थित राहणाऱ्या परदेशी पाहुण्यांना देण्यात येणारी रक्कम ही प्रोत्साहनपर आहे. यासंदर्भातील निर्णय पूर्वीचाच आहे. सध्या त्याची अंमलबजावणी होत आहे, असे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी स्पष्ट केले. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यात होत असलेले विश्व मराठी संमेलन हे मराठीच्या अस्मितेचे संमेलन असल्याने वादविवाद टाळून आपण मराठीचे वैभव जगाला दाखवावे,’ असे आवाहनही उदय सामंत यांनी केले.
-
भारताचा आज 76 वा प्रजासत्ताक दिन, इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो असणार प्रमुख पाहुणे
दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस भारतात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. यंदाही मोठ्या उत्साहात राज्यासह देशभरात ठिकठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत कर्तव्य पथावर लष्करी संचलन पार पडणार आहे. आज कर्तव्य पथावर होणाऱ्या विशेष कार्यक्रमासाठी इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. कर्तव्य पथावर होणाऱ्या संचलनात इंडोनेशियाचे मार्चिंग पथक आणि बँड पथकदेखील सहभागी होणार आहे.
-
मुंबईतील लोकल सेवा विस्कळीत, रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील वाहतूक उशिराने
ब्लॉकमुळे तिन्ही मार्गांवरील लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांचे 'मेगा'हालhttps://t.co/jDgsRTZRqo#mumbai #railway #local
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 26, 2025
Published On - Jan 26,2025 8:15 AM
