Maharashtra News 7 August 2024 : : पक्षाने संधी दिली तर सोनं करेल, उज्ज्वल निकम यांचे पुतणे रोहित निकम यांचं मोठं विधान
TV9 Marathi, Maharashtra Political News Headlines 6 August 2024 : आज 6 ऑगस्ट 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आमदारांच्या अपात्रता प्रकरणावर सुनावणी पार पडणार आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी विधानसभा निवडणूक, जागावाटपाबद्दल चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज धाराशिव दौऱ्यावर आहेत. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे अॅक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
उज्ज्वल निकम यांचे पुतणे रोहित निकम यांनी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छा व्यक्त केली
भाजपचे प्रवक्ते तथा राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचे पुतणे रोहित निकम यांनी लोकसभेनंतर आता विधानसभेसाठी इच्छा व्यक्त केली आहे. जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून पक्षाने संधी दिली तर सोनं करेल, अशी प्रतिक्रिया रोहित निकम यांनी दिली.
-
राज्य सरकार 3105 शिक्षकांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेणार
राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कॉन्ट्रॅक्ट बेसेस तत्वावर 17 वर्षांपासून सेवेत कार्यरत असलेल्या 3105 शिक्षकांना राज्य सरकार कायमस्वरूपी सेवेत सामावून घेणार आहे. या संदर्भात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली आहे. औसा विधानसभेचे भाजपा आमदार अभिमन्यू पवार यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने पत्राद्वारे पाठपुरावा केला होता. राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषद शाळेअंतर्गत केंद्रीय स्तरावर एक दिव्यांग शिक्षकाची नियुक्ती होणार असा निर्णय झाला आहे. या सर्व दिव्यांग शिक्षकांना पुढील दोन महिन्याच्या आत कायमस्वरूपी सेवेचे नियुक्ती प्रमाणपत्र मिळणार आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षकांच्या शिष्टमंडळाने आमदार अभिमन्यू पवार यांची भेट घेऊन सरकारचे आभार मानले आहेत.
-
-
सिद्धीविनायक मंदिर सुशोभिकरण, भाविकांसाठी सुविधा या कामांना गती द्यावी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
श्री सिद्धीविनायक मंदिरात येणाऱ्या भाविकांना उत्कृष्ट दर्जाच्या सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सुशोभिकरणाच्या कामाला गती द्यावी. या कामाचा शुभारंभ आगामी गणेश चतुर्थीच्या दिवशी व्हावा यासाठी नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे श्री सिद्धीविनायक गणपती मंदिर परिसर सुशोभिकरण व सोयी-सुविधांसंदर्भात कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. यावेळी मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, श्री सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष आमदार सदा सरवणकर, माजी खासदार राहुल शेवाळे, मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहल, मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी आदी उपस्थित होते.
श्री सिद्धीविनायक सुशोभिकरणासाठी मुंबई महापालिकेमार्फत पाचशे कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असून, या कामासंदर्भात आज मुख्यमंत्र्यासमोर सादरीकरण करण्यात आले. यात्रीनिवास, मंदिराच्या परिसरात पाच किलोमीटरच कॉरिडॉर, दुकाने, पार्कींग, भाविकांसाठी दर्शन रांग त्यातील सुविधा आदी विविध बांबीसंदर्भात सादरीकरणात माहिती देण्यात आली. या कामांचा संदर्भात तातडीने तांत्रिक बाबी पूर्ण करून, येणाऱ्या गणेश चतुर्थीला कामांचा शुभारंभ करता येईल, अशा पद्धतीने नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या.
-
स्टुडंट राईट असोशिएनची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी
राज्यातील दिव्यांग प्रवर्गातून नोकरी मिळवलेल्या उमेदवारांची फेर मेडीकल तपासणी करुन खोट्या प्रमाणपत्राची चौकशी करा, अशी मागणी स्टुडंट राईट असोशिएनने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
-
लोकसभेतील नवनियुक्त-जुन्या खासदारांसोबत ठाकरेंचा संवाद सुरू
शिवसेना उबाठाप्रमुख उद्धव ठाकरे यांची दिल्लीत खासदारांसोबत चर्चा सुरु आहे. या संवादात खासदार अनिल देसाई, खासदार संजय दिना पाटील, खासदार अरविंद सावंत, खासदार संजय देशमुख, खासदार संजय जाधव, खासदार संजय राऊत, खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि खासदार राजाभाऊ वाजे यांच्यासह माजी मंत्री अनिल परब आणि आमदार मिलिंद नार्वेकर उपस्थित आहेत.
-
-
मणिपूर येथे कर्तव्यावर असताना जवान सुनील पाटील यांचे अपघाती निधन
धुळे तालुक्यातील सौंदाणे येथील जवानाला वीरमरण आलं आहे. मणिपूर येथे कर्तव्यावर असताना जवान सुनील पाटील यांचे अपघाती निधन झालं आहे. वीर जवान सुनील पाटील यांचे उद्या सकाळी सौंदाणे या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
-
नौपाडा परिसरात 8 तासासाठी वाहतुकीत बदल
‘योद्धा कर्मयोगी एकनाथ शिंदे’ या चरित्रग्रंथाचे बुधवारी 7 ऑगस्टला प्रकाशन होणार आहे. नवनियुक्त राज्यपालांच्या हस्ते ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे संध्याकाळी हा प्रकाशन सोहळा होणार आहे. या चरित्रग्रंथातून मुख्यंमत्र्यांची कौटुंबिक वाटचाल, राजकीय कारकीर्द आणि इतर उल्लेखनीय कामगिरीचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार सह आमदार खासदार यांना देखील आमंत्रित करण्यात आले आहे. तसेच परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये, परिसरातील वाहतूक सुरळीत-सुनिश्चित राहण्यासाठी नौपाडा परिसरात 8 तासासाठी वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
-
पुण्यात जीवघेणा अपघात टळला, ड्रायव्हरविना रिव्हर्स गिअरमध्ये गाडी सुस्साट
पुण्याच्या हडपसर परिसरातून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ड्रायव्हर नसलेली एक पीकअप गाडी रिव्हर्स गिअरमध्ये सुस्साट धावताना दिसत आहे..पुणे मनपाच्या रस्ते देखभाल आणि दुरुस्तीची ही गाडी असल्याचे समोर आले आहे. अत्यंत भयानक आणि जिवेघेणा असा हा व्हिडिओ सध्या सोशल माध्यमावर व्हायरल होत आहे.
-
मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीहुन तुळजापूरकडे रवाना
पश्चिम महाराष्ट्रात दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीहुन तुळजापूरकडे रवाना झाले आहेत. आज तुळजापूर मुक्काम केल्यानंतर उद्या जरांगे पाटील सोलापूर मध्ये जाणार आहेत.
-
सोनिया दुहन यांचा हरियाणा काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज प्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेस मधील विद्यार्थिनी संघटनेच्या सोनिया दुहन अखेर काँग्रेसमध्ये गेल्या आहेत. हरियाणा काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज प्रवेश केला. आगामी हरियाणा विधानसभा निवडणुकीत सोनिया काँग्रेसकडून उमेदवार असणार आहेत. यापूर्वी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सोनिया दूहन यांनी काम केलं होतं.
-
खडकवासल्याची जागा कुणाला द्यायची याबाबत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार अंतिम निर्णय घेतील- भीमराव तापकीर
पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल, खडकवासल्याची जागा कुणाला द्यायची याबाबत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार अंतिम निर्णय घेणार आहेत. पक्षाने मला तीन वेळा या मतदारसंघातून संधी दिली आहे. पक्षाने आता घरी बसायला सांगितलं तरी घरी बसेल. राष्ट्रवादीने दावा करणे त्यात काही गैर नाही, असं भाजपचे आमदार भीमराव तापकीर म्हणाले.
-
लालू यादव आणि तेजस्वी यांच्यावर आरोपपत्र दाखल
ईडीने नोकरीसाठी जमीन घोटाळा प्रकरणात माजी रेल्वे मंत्री लालू प्रसाद, त्यांचा मुलगा तेजस्वी यादव आणि इतरांविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे.
-
शेख हसीना हिंडन एअरबेसमधून बाहेर पडणार नाहीत
बांगलादेश सोडून गेलेल्या शेख हसीना आणखी काही दिवस भारतात राहू शकतात. पण ती हिंडन एअरबेसमधून बाहेर पडणार नाही. हिंडन एअरबेसवरच गेस्ट हाऊसमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शेख हसीनासोबत आलेले काही नातेवाईक लंडनला रवाना झाले आहेत. कुठे जायचे हे शेख हसीना स्वतः ठरवतील.
-
शेख हसीना भारतात शॉर्ट नोटीसवर आल्या आहेत, लोकसभेत परराष्ट्र मंत्र्यांचं स्पष्टीकरण
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बांगलादेशबाबत लोकसभेत सांगितले की, शेख हसीना शॉर्ट नोटीसवर भारतात आल्या आहेत. गेल्या 24 तासात ढाकाच्या संपर्कात आहेत. जूनमध्येच बहुतांश विद्यार्थी भारतात परतले आहेत. आम्ही बांगलादेशातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. आम्ही बांगलादेशातील भारतीयांच्या संपर्कात आहोत.
-
भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावली
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती स्थिर आहे.
-
पूजा खेडकर यांच्या अडचणी वाढणार
पूजा खेडकर यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे पूजा खेडकरांच्या विरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याच्या तयारीत आहेत. शिवाय बदनामी केल्याप्रकरणी पूजा खेडकरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे. कायदेशीर सल्ला घेऊन पुणे जिल्हाधिकारी पुढील कारवाई करणार आहेत.
-
भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ
उजनी आणि वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. उजनी आणि वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या दमदार पावसामुळे उजनी धरणातून काल एक लाख 25 हजार क्युसेक्स तर वीरधरणातून 41 हजार क्युसेक्स इतका विसर्ग भीमा नदीपात्रात सोडण्यात आला. अंबाबाई पटांगण येथील व्यास नारायण झोपडपट्टीतील अनेक घरात पाणी घुसलं आहे. व्यास नारायण झोपडपट्टीतील 35 कुटुंबांचं काल रात्रीच स्थलांतर केलं होतं.
-
परभणी विधानसभेवर भाजपचा दावा
परभणी विधानसभेवर भाजपने दावा केला. सध्या परभणी विधानसभेवर ठाकरे गटाचे आमदार आहेत. शिंदे गटाकडून परभणी विधानसभा शिंदे गटाला सोडण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र भाजपने त्यावर दावा केला आहे. 2014 साली भाजपने पहिल्यांदा निवडणूक लढवली होती त्यात, 42 हजार मतदान भाजप उमेदवार आनंद भरोसे यांनी घेतले होते. परभणी विधानसभा नेहमी हिंदुत्व विचार असलेला मतदारसंघ आहे, असं म्हणत हा दावा करण्यात आला आहे.
-
कृती समितीचं आंदोलन चिघळलं
17 सवर्ग पदभरती कृती समितीचे आंदोलन चिघळले. आंदोलक आंदोलन स्थळाहून आदिवासी विकास भवनावर दाखल झाले आहेत. सत्ताधारी आमदार आमशा पाडवींही आंदोलनात सहभागी झाले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे आमदार आमशा पाडवींसमोर शिंदे सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आहेत. आमशा पाडावी समोर सरकार विरोधात आंदोलकांकडून घोषणा देण्यात येत आहे.
-
गाढ झोपलेल्या उठवण्यासाठी अग्निशमन दलाची मदत
घरात गाढ झोपत झोपलेल्या मुलाला उठविण्यासाठी चक्क अग्निशमन दलाची मदत पिंपरी चिंचवड शहरात घेण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील रिवर रोडवरील यशोमंगल हाऊसिंग सोसायटीमध्ये काल संध्याकाळी साडेपाच वाजता दरम्यान ही घटना घडली आहे.
-
2 झिका व्हायरस सदृश्य रुग्ण व 5 डेंग्यूसदृश्य रुग्ण
करमाळा तालुक्यात 2 झिका व्हायरस सदृश्य रुग्ण व 5 डेंग्यूसदृश्य रुग्ण आढळले. करमाळा शहरात 5 डेंग्यूसदृश्य रुग्ण आढळले. 4 महिला व 1 पुरुषाचा डेंग्यूसदृश्य आजारात समावेश आहे. करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागात 2 झिका व्हायरस सदृश्य रुग्ण आढळले.
-
लक्ष्मण हाके यांची राज ठाकरे यांच्यावर टीका
राज ठाकरे यांनी प्रबोधनकार यांच्या घरात जन्माला येऊन अशा प्रकारचे भेजाबाबदारी असविधानिक वक्तव्य करत आहे याची कीव करावीशी वाटते, अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली.
-
दोन तोळ्याची चेन हिसकावली
नाशिकच्या आडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्वामी समर्थ नगर या ठिकाणी एका महिलेची सोन साखळी चोरट्यांनी हिसकावली. महिलेवर नजर ठेवून बंगल्याबाहेर चोरटे पाळत ठेऊन होते.महिलेच्या गळ्यातील तब्बल दोन तोळ्याची चेन लंपास करून चोरटे फरार झाले.
-
अमोल मिटकरी यांचा असा पण निषेध
मावळ तालुका अध्यक्ष यांच्या जन्मदिवसाचे यावेळी आमदार अमोल मिटकरी यांच्या नावाचा केक तयार करण्यात आला, त्यावर निषेधाचा मजकूर होता, अमोल मिटकरी यांचा निषेध करून हा केक कापून राज ठाकरे यांच्यावर केलेल्या व्यक्तव्याचा निषेध करण्यात आला.
-
थोड्याच वेळात अजित पवार गटाच्या आमदारांची बैठक
पुणे जिल्ह्यातील अजित पवार गटाच्या आमदारांची आज मुंबईत बैठक होत आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत बैठक होत आहे. अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी साडेचार वाजता बैठक होईल. बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीवर चर्चा होणार आहे. शिवाय जिल्ह्यातील जागा वाटपावर अजित पवार आमदारांशी चर्चा करतील.
-
मराठा आंदोलनात 200 ते 500 कोटी रुपयांचा घोटाळा
मनोज जरांगे यांच्या आंदोलनात 200 ते 500 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप ओबीसी उपोषण करते नवनाथ वाघमारे यांनी केला आहे. जरांगे पाटील यांनी एकदा बोलताना आंदोलनात शंभर कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा केल्याचा आरोप त्यांनी केला. तर आता हा आकडा 200 ते 500 कोटी रुपयांच्या घरात पोहचल्याचा आरोप त्यांनी केली. जरांगे पाटील यांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
-
जुनी पेन्शनच्या मागणीसाठी शिक्षक आक्रमक
नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांचा आंदोलन. नंदुरबार जिल्हा शैक्षणिक संघटनेतर्फे एकदिवशीय धरणे आंदोलनाला सुरुवात….
-
पुण्यात २४ ऑगस्टला संविधान सन्मान सभा
बालगंधर्व रंगमंदिरात होणार सभा. सभेला शरद पवारांची असणार प्रमुख उपस्थिती
-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हाध्यक्ष सह शहराध्यक्षाला पोलिसांकडून अटक
जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले , शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी केली अटक. खंडणी आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल
-
माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ आक्रमक
भाजपने राज्यपाल पदाचे दिलेले आश्वासन पाळले नसल्याचा आनंदराव अडसूळ यांचा आरोप. सर्वोच्च न्यायालयाने नवनीत राणा यांच्या जात वैधता प्रमाणपत्राचा दिलेला निर्णय अयोग्य असल्याचा अडसूळ यांचा आरोप.
-
आमचा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा- रमेश केरे
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं. आमचा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा आहे. फडणवीस भाजपची भूमिका मांडणार आहेत. भूमिका मांडणार असं फडणवीसांना आम्हाला सांगितलं आहे, अशी प्रतिक्रिया भेटीनंतर रमेश केरे यांनी दिली.
-
शेख हसिना भारतातच असून हिंडन एअरबेसच्या गेस्ट हाऊसमध्ये मुक्कामी
शेख हसिना भारतातच असून हिंडन एअरबेसच्या गेस्ट हाऊसमध्ये मुक्कामी आहेत. गाझियाबादच्या हिंडन एअरबेसवर हालचाली वाढल्या आहेत. हिंडन एअरबेसवर 2 VVIP गाड्या दाखल झाल्या आहेत. शेख हसिना यांना घेऊन आलेलं विमान बांगलादेशकडे रवाना झालं आहे.
-
धाराशिव- राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीला सुरुवात
धाराशिव- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीला सुरुवात झाली आहे. धाराशिव जिल्ह्यातील चारही विधानसभेचा विधानसभा मतदारसंघ निहाय आढावा घेणार आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पक्षाच्या ताकदीची चाचपणी करणार आहेत. काल झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
-
बीकेसीतील सायकल ट्रॅकवरून लोढा-ठाकरेंमध्ये वाद होण्याची शक्यता
बीकेसीतील सायकल ट्रॅकवरून लोढा-ठाकरेंमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. बीकेसीमधील सायकल ट्रॅक मुख्य रस्त्याला जोडून घ्या, असं पत्र मंगलप्रभात लोढा यांनी एमएमआरडीए आयुक्तांना दिलं आहे. बीकेसीतील सायकल ट्रॅक वापरात नसल्याने रस्त्याला जोडा, असं त्यांनी पत्रात लिहिलंय. पालकमंत्री असताना आदित्य ठाकरेंनी या सायकल ट्रॅकचं उद्घाटन केलं होतं.
-
“काल धाराशिवमधील आंदोलनात पवार, ठाकरे गटाचे कार्यकर्ते होते”, मनसे नेत्याचा आरोप
काल धाराशिवमधील आंदोलनात पवार, ठाकरे गटाचे कार्यकर्ते होते, असा गंभीर आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. मराठा आंदोलनाच्या वेशात आपली माणसं पेरण्याचं काम सुरू आहे, असंही ते म्हणाले. राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेलबाहेर काल ठिय्या आंदोलन करण्यात आलं होतं.
-
पूर ओसरल्यानंतर गोदावरीच्या नदीकाठावर दगडांचा ढीग
गोदावरीच्या नदीपात्रात दगड वाहून आले. पूर ओसरल्यानंतर गोदावरीच्या नदीकाठावर दगडांचा ढीग पडला आहे. महापालिका प्रशासनाकडून स्वच्छतेचं काम सुरू आहे. घनकचरा व्यवस्थापन विभाग गोदाकाठाची स्वच्छता करणार आहे. होळकर पुलाच्या बाजूला सुरू असलेल्या बांधकाम साइटवरून दगड वाहून आले आहेत.
-
Maharashtra News : अमेरिकन महिलेचा तो बनाव असल्याचं उघड
सिंधुदुर्गातील सोनुर्लीच्या जंगलात साखळदंडाने बांधलेल्या अवस्थेत सापडली होती अमेरिकन महिला. ललिता कुमार असं या महिलेचं नाव. रत्नागिरीतल्या मनोरुग्णालयात उपचार सुरु. अमेरिकन व्हिसा संपल्याने आणि अमेरिकेतून पुरेसे पैसे येत नसल्याने तणावातून जीवन संपवण्यासाठी आपण स्वतःला बांधून घेतल्याची महिलेची कबूली. मनोरुग्ण महिलेने तसच मनोरुग्णालयातील वरिष्ठ वैद्यकिय अधिकाऱ्यांनी माहिती दिली.
-
Maharashtra News : ताडोबामधील वाघिणीच्या लघुपटाला इटलीत पुरस्कार
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील नयनतारा वाघिणीच्या लघुपटाला इटलीतील गोल्डन लीप पुरस्कार. प्रकल्पातल्या नाल्यातून प्लास्टिकची बाटली तोंडात पकडून बाहेर काढतानाचा तिचा व्हिडिओ समाज माध्यमावर झाला होता व्हायरल. नागपूरचे छायाचित्रकार दीप काठीकर यांनी शूट केला होता हा व्हिडिओ.
-
Maharashtra News : अजित पवार गटाच्या आमदारांची आज मुंबईत बैठक
पुणे जिल्ह्यातील अजित पवार गटाच्या आमदारांची आज मुंबईत बैठक. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत होणार बैठक. अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी साडेचार वाजता होणार बैठक. बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीवर होणार चर्चा. शिवाय जिल्ह्यातील जागावाटपावर अजित पवार करणार आमदारांशी चर्चा.
-
Maharashtra News : सुप्रीम कोर्टाचा सल्ला मागता येतो – उल्हास बापट
“सुनावणी दोन आठवड्यांनी होईल असा निर्णय आला, मला दोन महिने लागतील असं अपेक्षित होतं. विश्वासार्हता फार कमी होत चालली आहे. सगळा शेवट लोकांच्या हातात आहे. सगळ्या यंत्रणा जरी चुकीच्या वाटल्या तरी सुद्धा लोकांनी निर्णय घ्यावा. सुप्रीम कोर्टाचा सल्ला मागता येतो मी काही राजकीय नेत्यांना सांगितलं आहे” असं उल्हास बापट म्हणाले.
-
Maharashtra News: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण, सुप्रीम कोर्टात 2 आठवड्यांनी सुनावणी होणार…
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण, सुप्रीम कोर्टात 2 आठवड्यांनी सुनावणी होणार असल्याची माहिती मिळत आहे… आज होणारी सुनावणी पुढे ढकलली…
-
Maharashtra News: जळगावच्या सराफ बाजारात सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण
सोन्याचे दर १ हजार २३९ रुपयांनी, तर चांदीचे दर ३ हजार ६९३ रुपयांनी झाले कमी झाले… चांदीचे दर आले ८२ हजार रुपयांवर तर सोन्याचे दर ६९ हजार ६०० रुपयांवर पोहोचले… अमेरिकन अर्थव्यवस्थेत मंदीची शक्यता, इराण व इस्रायल युद्ध भडकण्याची भीती आणि बांगलादेशातील घडामोडींचा परिणाम बाजारावर दिसून आला
-
Maharashtra News: आज शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्रतेची सुनावणी
आज शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्रतेची सुनावणी होणार आहे. सर्वप्रथम शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी होणार… शिवसेनेनंतर राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी होणार…
-
Maharashtra News: पालघरच्या रणकोळ आश्रम शाळेतील 27 विद्यार्थीनींना विषबाधा
पालघरच्या रणकोळ आश्रम शाळेतील 27 विद्यार्थीनींना विषबाधा… विषबाधा झालेल्या विद्यार्थीनींवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु… पहाटे उलटी आणि जुलाबाचा विद्यार्थीनींना त्रास…
-
Maharashtra News: दुपारी तीन वाजता उद्धव ठाकरे दिल्लीत दाखल होणार
दुपारी तीन वाजता उद्धव ठाकरे दिल्लीत दाखल होणार… ठाकरे कुटुंबीयांचा मुक्काम खासदार संजय राऊत यांच्याच घरी… राऊत यांच्या निवासस्थानी जोरदार तयारी…. आज पहिल्या दिवशी ठाकरे आणि काँग्रेस मधील वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी होणार
-
Maharashtra News: अजित पवार गटाच्या जनसन्मान यात्रेचा टीझर रिलीज
अजित पवार गटाच्या जनसन्मान यात्रेचा टीझर रिलीज… जनसेवक आम्ही शब्दाचे आहोत पक्के…, टीझरमध्ये उल्लेख…
-
अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख , लाडकी बहीण योजनेवरून होणाऱ्या टीकेला अजित पवार यांचं प्रत्युत्तर
लाडकी बहीण योजनेवरून होणाऱ्या टीकेला अजित पवार यांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिलं आहे. ‘माझी लाडकी बहीण योजना’ टिकवणं शक्य नसल्याचं विरोधी पक्ष सांगत आहेत. परंतु अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख आहे. तोच माझा स्वाभिमान आहे. ही कल्याणकारी योजना विरोधकांना बंद पाडायची आहे, तसं त्यांनी स्पष्ट देखील केलं आहे कारण, ही योजना यशस्वीपणे राबवणं अशक्य आहे असं त्यांचे भाकित आहे. परंतु येत्या काळात या योजनेला अधिक बळकटी देवून या योजनेची रक्कम वाढवण्यासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करेन, अस पवार यांनी म्हटलं आहे.
‘माझी लाडकी बहीण योजना’ टिकवणं शक्य नसल्याचं विरोधी पक्ष सांगत आहेत. परंतु अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख आहे. तोच माझा स्वाभिमान आहे. ही कल्याणकारी योजना विरोधकांना बंद पाडायची आहे, तसं त्यांनी स्पष्ट देखील केलं आहे कारण, ही योजना यशस्वीपणे राबवणं अशक्य आहे असं त्यांचे भाकित…
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) August 6, 2024
-
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून दखल, एसटी कर्मचारी संघटनांची बोलावली बैठक
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दखल घेतली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एसटी कर्मचारी संघटनांची बैठक होणार आहे. कॅबिनेट बैठक पार पडल्यानंतर ही बैठक होणार आहे. येत्या 9 ऑगस्टपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप रोखण्यासाठी सरकारकडून हालचाली सुरू आहेत.
-
शेख हसिनांकडून लोकशाहीच्या मुखवट्याखाली हुकूमशाही – संजय राऊत
शेख हसिना यांनी लोकशाहीच्या मुखवट्याखाली हुकूमशाही केली. शेख हसिना यांच्यावरून देशातील राज्यकर्त्यांनी चिंतन करावं. बांगलादेशवरून दिल्लीतील सरकारने धडा घ्यावा, असं संजय राऊत म्हणाले.
-
मुंबईहून ढाका येथे जाणारं इंडिगोचं विमान रद्द
मुंबईहून ढाका येथे जाणारं इंडिगोचं विमान रद्द करण्यात आलं आहे. ढाका येथे जाणाख्या प्रवाशांना तिकीटाचे पैसे परत देण्यात आले आहेत. इंडिगो एअरलाइनने ट्विट करत ही माहिती दिली आहे.
तर व्हिस्तारा एअरलाईन्सच्या ढाका येथील उड्डाणासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.
#6ETravelAdvisory : In view of the ongoing situation in #Dhaka, all flights scheduled for tomorrow have unfortunately been cancelled. We understand that this may cause significant inconvenience and disruption to your travel plans and we sincerely regret this development.
— IndiGo (@IndiGo6E) August 5, 2024
-
नवी दिल्ली – बांगलादेश प्रकरणी आज संसदेत सर्वपक्षीय बैठक
बांगलादेश प्रकरणी आज सकाळी दहा वाजता संसदेत सर्वपक्षीय बैठक होणार आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली असून सर्व पक्षातील वरिष्ठ नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीनंतर बांगलादेश बाबत सरकारतर्फे संसदेत निवेदन देण्यात येईल.
-
देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरातील आमदारांची बैठक बोलावली
देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरातील आमदारांची बैठक बोलावली. आज रात्री ८ वाजता सागर बंगल्यावर बैठकीच आयोजन करण्यात आलं असून महत्वाची चर्चा होणार आहे. विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने ही बैठक बोलवण्यात आली असून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड आणि पालघरमधील आमदार या बैठकीस उपस्थित राहतील.
-
Maharashtra News Live : वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पुणे पोलिसांचा ॲक्शन प्लॅन, मुख्य चौकातील रस्त्यांवर अवजड वाहनांना बंदी
पुणे शहरातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पुणे पोलिसांचा ॲक्शन प्लॅन
पुणे शहरातील 30 मुख्य चौकातील रस्त्यांवर अवजड वाहनांना करण्यात आली बंदी
पुणे शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाकडून अवजड वाहनांना शहरात बंदी घालण्याचा निर्णय
5 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट पर्यंत सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत अत्यावश्यक वाहने सोडून सर्व जड वाहनांना शहरातील मुख्य चौकात बंदी
संचेती चौक,कोर्ट रोड, पौड फाटा चौक, डेक्कन, लॉ कॉलेज रोड, दांडेकर पूल, राजाराम पूल, बाजीराव रोड, शनिवार वाडा चौक या मुख्य चौकात घालण्यात आली अवजड वाहनांना बंदी
-
Maharashtra News Live : पुण्यात झिका विषाणूचे एकूण 66 रुग्ण
पुणे शहरात झिकाचा धोका वाढला
शहरात झिका विषाणूचे एकूण 66 रुग्ण
26 गर्भवती महिलांना देखील झिका विषाणूची लागण
संपर्कात आलेल्या सर्वांची पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून होणार तपासणी
पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरात घेलती जातीय खबरदारी
-
Maharashtra News Live : सेट परीक्षेचा निकाल जाहीर, 7263 उमेदवार पात्र
पुणे – सेट परीक्षेचा निकाल जाहीर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाद्वारे घेण्यात आलेल्या सहाय्यक प्राध्यापक पदासाठीच्या पात्रता परीक्षेचा (सेट) निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेत 7263 उमेदवार पात्र ठरले. पात्र ठरलेल्यांची टक्केवारी 6.66 आहे. विद्यापीठाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांसाठी सेट परीक्षा घेतली जाते. त्यानुसार 39 वी सेट परीक्षा 7 एप्रिल रोजी 17 शहरांमधील केंद्रांवर घेण्यात आली. एकूण एक लाख 9 हजार 250 उमेदवारांनी ही परीक्षा दिली. मात्र, या परीक्षेला एसईबीसी आरक्षण लागू करण्याची मागणी करण्यात आल्याने त्याबाबतची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात निकाल जाहीर करण्यास विलंब झाला
-
Maharashtra News Live : गणेशोत्सवासाठी पुणे ते रत्नागिरी दरम्यान 6 अतिरिक्त फेऱ्या
पुणे रेल्वे स्टेशनवरून गणेशोत्सवासाठी कोकणाकडे पुणे ते रत्नागिरी दरम्यानच्या 6 अतिरिक्त फेऱ्या सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
आरक्षण गाडी क्रमांक ०१४४५, ०१४३६, ०१४४७, ०१४४८ चे बुकिंग सात ऑगस्टपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रावर अथवा www.irctc.co.in या वेबसाइटवर उपल्बध आहे.
रेल्वे जनसंपर्क अधिकारी रामपाल बडपग्गा यांनी ही माहिती दिली.
-
Maharashtra News Live : नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याची उद्या सुनावणी, सुनील केदार यांना नोटीस
नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याची अखेर सहकारमंत्री घेणार सुनावणी
सुनील केदार याना सहकार मंत्र्यांची नोटीस
बुधवार 7 ऑगस्ट ला होणार मुंबईत सुनावणी
सहकार मंत्री हे सुनावणी घेण्यासाठी टाळाटाळ करीत आहे असा आरोप भाजपकडून आंदोलन दरम्यान आशिष देशमुख यांनी केला होता
यासाठी आशिष देशमुख यांच्या नेतृत्वात सावनेर मध्ये पीडितां कडून आंदोलन सुद्धा करण्यात आलं होतं
सुनील केदार हे जिल्हा बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी असून त्यांच्याकडून या घोटाळ्यातील रक्कम वसूल करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे
Published On - Aug 06,2024 8:52 AM
