PHOTO | आश्चर्य! धुळ्यात गायीने दिला चार वासरांना जन्म; दुर्मिळ घटनेमुळे बघ्यांची गर्दी

  • विशाल ठाकूर, टीव्ही 9 मराठी, धुळे
  • Published On - 17:10 PM, 3 Dec 2020
साक्री तालुक्यातील पिंपळनेर गावात सर्वांना चकित करणारी आश्चर्यकारक घटना घडली आहे. एका गाईने चक्क चार पिलांना जन्म दिला आहे. जन्मदाती गाय आणि तिचे चारही वासरं सुखरुप आहेत. या गाईला आणि तिच्या चारही वासरांना पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी होत आहे.
तुम्ही आज पर्यंत गाईला एक किंवा दोन बछडे झाले असल्याचे बघितले असेल किंवा ऐकले असेल. परंतु साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे एका गाईने चक्क चार पिलांना जन्म दिल्याने सर्वच जण थक्क झाल्याचे दिसून आले.
पिंपळनेर येथील गाईचे व्यापारी सतीश निकम यांचा गेल्या दहा ते बारा वर्षांपासूनचा जनावरे विकण्याचा व्यवसाय आहे. सतीश निकम या व्यापाऱ्याने नेहमीप्रमाणेच विक्रीसाठी आणलेली गाय बाजारामध्ये विकण्यासाठी नेली असता बाजारामध्ये गाईने चार बछड्यांना जन्म दिला. संबंधित व्यापाऱ्याने तात्काळ गाईला आणि बछड्यांना न विकता आपल्या घरी आणले
त्यानंतर संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांची तपासणी करण्यास सांगितले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर गाय आणि बछडे सुरक्षित असल्याचं सांगितल आहे.
चार बछड्यांना जन्म देणारी गाय ही आपणास लाभदायक असल्याचे म्हणत व्यापाऱ्याने त्या गाईला आता न विकण्याचा निर्णय घेत तिचे आणि तिच्या चार बछड्यांचं संगोपन करण्याचा निर्णय घेतला आहे.
या दुर्मिळ घटनेची चर्चा सध्या संपूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये सुरु असून या गाईला आणि बछड्यांना बघण्यासाठी बघ्यांची गर्दी जमली आहे.