Asia Cup Final : अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान आमनेसामने, रविवारी हायव्होल्टेज सामना
अंडर 19 आशिया कप 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत पाकिस्तान लढत होणार आहे. भारताने उपांत्य फेरीत श्रीलंकेला, तर पाकिस्तानने बांगलादेशला पराभूत केलं आहे. आता अंतिम फेरीत भारत पाकिस्तान हा हायव्होल्टेज सामना पाहण्याची संधी मिळणार आहे.

अंडर 19 आशिया कप स्पर्धेत पुन्हा एकदा भारत पाकिस्तान लढत होणार आहे. दोन्ही संघ साखळी फेरीत एकाच गटात होते आणि भारताने पाकिस्तानला पराभवाचं पाणी पाजलं होतं. आता दोन्ही संघ अंतिम फेरीत एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. उपांत्य फेरीत भारताने श्रीलंकेला पराभूत केलं. तर पाकिस्तानने बांगलादेशचा धुव्वा उडवला. या दोन्ही सामन्यात पावसामुळे मैदान ओलं झालं होतं. त्यामुळे सामना सुरू होण्यास उशीर झाला. इतकंच काय तर हा षटकंही कमी करण्यात आली. भारत श्रीलंका सामना 20 षटकांचा करण्यात आला. श्रीलंकेने 20 षटकात भारतासमोर विजयासाठी 139 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान भारताने 2 गडी गमवून पूर्ण केलं. तर पाकिस्तान आणि बांग्लादेश सामना 27 षटकांचा करण्यात आला होता. बांगलादेशने 26.3 षटकात सर्व गडी गमवून 121 धावा केल्या आणि विजयासाठी 122 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान पाकिस्तानने दोन गडी गमवून सहज गाठलं आहे. या दोन सामन्यातील निकालानंतर आता वेध लागले आहेत ते अंतिम फेरीचे.. कारण भारत पाकिस्तान हे दोन संघ जेतेपदासाठी लढणार आहेत.
साखळी फेरीत भारत आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने आले होते. तेव्हा भारताने 46.1 षटकात सर्व गडी गमवून 240 धावा केल्या होत्या. तेव्हा हा सामना भारताच्या हातून गेला असंच वाटत होतं. पण भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला 150 धावांवर गुंडाळलं आणि हा सामना 90 धावांनी जिंकला होता. आता त्या विजयाची पुनरावृत्ती करण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. तर पाकिस्तान पराभवातून सावरत जेतेपद मिळवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. भारत पाकिस्तान संघ पुन्हा आमनेसामने येणार असल्याने हायव्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. हा 21 डिसेंबर रोजी बारतीय वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता सुरु होईल.
दोन्ही संघातील खेळाडू
भारत अंडर 19 संघ: आयुष म्हात्रे (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, आरोन जॉर्ज, विहान मल्होत्रा, वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू (विकेटकीपर), कनिष्क चौहान, खिलन पटेल, दीपेश देवेंद्रन, किशन कुमार सिंग, हेनिल पटेल, हरवंश पनगालिया, नमन पुष्पक, युवराज गोविंद, गोविंद मोहन.
पाकिस्तान अंडर 19 संघ: उस्मान खान, समीर मिन्हास, अली हसन बलोच, अहमद हुसैन, फरहान युसफ (कर्णधार), हमजा जहूर (विकेटकीपर), हुजैफा अहसान, निकाब शफीक, दानियाल अली खान, मोहम्मद सय्यम, अली रझा, अब्दुल सुभान, मोहम्मद हुजैफा, मोमीन कमर, मोहम्मद शायन.
