Jejuri Incident : जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका, भाजलेले लोकं आरडा-ओरड करत धावत सुटले… प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं घडलं काय?

Jejuri Incident : जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका, भाजलेले लोकं आरडा-ओरड करत धावत सुटले… प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं घडलं काय?

| Updated on: Dec 22, 2025 | 2:37 PM

जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना नगरपरिषद निवडणुकीच्या मिरवणुकीदरम्यान भंडाऱ्याच्या भडक्यामुळे भाजले. अनेक नागरिक जखमी झाले. भेसळयुक्त भंडाऱ्यामुळे ही घटना घडल्याचा आरोप माजी विश्वस्तांनी केला असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

जेजुरीच्या खंडेरायाच्या मंदिरात नुकत्याच घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने भेसळयुक्त भंडाऱ्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. नगरपरिषद निवडणुकीतील विजयी उमेदवारांच्या मिरवणुकीदरम्यान, जेजुरी गडाच्या पहिल्या पायरीवर भंडाऱ्याच्या अचानक उडालेल्या भडक्यामुळे अनेक भाविक गंभीर जखमी झाले. यामध्ये स्थानिक नागरिक, महिला वर्ग आणि लहान मुलांचा समावेश होता, ज्यांना मोठ्या प्रमाणात भाजले गेले. ही घटना घडली तेव्हा पायरीवर मोठ्या प्रमाणात गर्दी होती आणि भाविक भंडारा उधळत होते. एका प्रत्यक्षदर्शीभंडारा विक्रेत्याने सांगितले की, निवडणुकीत निवडून आलेले लोक आरती करत असताना खाली कापूर लावला होता आणि वरून भंडारा उधळला जात होता. याच वेळी जोरदार भडका होऊन पळापळ झाली आणि अनेक लोक भाजले गेले. या घटनेचे कारण भंडाऱ्यातील भेसळ असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.

जेजुरी देवस्थानचे माजी प्रमुख विश्वस्त शिवराज झगडे यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, गेले अनेक वर्षांपासून ते पत्रकारितेच्या माध्यमातून भेसळयुक्त भंडारा आणि कुंकू याबद्दल आवाज उठवत आहेत. २०११-१२ च्या दरम्यान, त्यांनी आणि इतर विश्वस्तांनी पुणे येथील औंध विभागातील अन्न व औषध भेसळ प्रशासनाकडे भेसळयुक्त भंडाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करत नमुने तपासण्यास सांगितले होते. मात्र, त्या अहवालानुसार कोणतीही पुढील कारवाई झाली नाही

Published on: Dec 22, 2025 02:37 PM