Gopichand Padalkar :…म्हणून दुग्धाभिषेक केला, गोपीचंद पडळकरांची राष्ट्रवादीवर टीका
अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या दिवशीच गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडलंय.
जेजुरी : राजकारणात कधी कशावरुन वाद होईल सांगता येत नाही. आज अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar) यांची जयंती आहे. यावरुन आता जेजुरीत राजकारण पेटल्याचं दिसतंय. आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि राष्ट्रवादी (NCP) यांच्यातील शाब्दिक चकमक नवीन विषय नाही. मात्र, आज अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या दिवशीच गोपीचंद पडळकर यांनी टीकास्त्र सोडलंय. ते म्हणाले की, ‘जातीयवादी लोकांनी अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं आहे. त्यामुळे पुतळ्याला दुग्धभिषेक घालून शुध्दीकरण केलं,’ अशी टीका पडळकर यांनी राष्ट्रवादीवर केली आहे. यापूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुतळा अनावरण केल्यानंतर देखील त्यांच्यावर टीका झाली होती. चौंडी येथे अहिल्याबाई होळकर यांचा जयंती उत्सव आज आहे. याठिकाणी श्री क्षेत्र जेजुरी गडावर मल्हारी मार्तंड खंडेरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होतेय. याठिकाणी सदाभाऊ खोत देखील उपस्थित होते.
