Ambernath Train Accident : तिच्या कानात हेडफोन, तो तिचा जीव वाचवायला गेला पण… दोघांचाही रेल्वेखाली आल्याने मृत्यू
आतिष याच्या दोन्ही मोठ्या बहिणींची लग्नं झालेली असून तो त्याच्या वृद्ध आईवडिलांचा एकमेव आधार होता. त्याच्या अशा अकाली मृत्यूनं आई वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
एक धक्कादायक बातमी आहे. कानात हेडफोन घालून रेल्वे रूळ ओलांडताना रेल्वेच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाला, तर या महिलेला वाचवायला गेलेला तिच्या सहकारी तरुणानेही यात जीव गमावला. अंबरनाथच्या मोरीवली गावाजवळ ही घटना घडली. अंबरनाथच्या मोरीवली गावात राहणाऱ्या ४५ वर्षीय वैशाली सुनील धोत्रे आणि महालक्ष्मी नगरमध्ये राहणारा २९ वर्षीय आतिष रमेश आंबेकर हे दोघे अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीत एकाच कंपनीत कामाला होते. रविवारी २० जुलै रोजी संध्याकाळी साजेसात वाजेच्या सुमारास ते कंपनीतून घरी जाण्यासाठी निघाले. यावेळी आतिष हा वैशाली यांना सोडण्यासाठी बी केबीन रोडवरील मोरीवली गावाजवळ गेला. तिथून वैशाली या कानात हेडफोन घालून फोनवर बोलत रेल्वे रूळ ओलांडत असतानाच रेल्वे आली, यावेळी आतिष आणि अन्य काही लोकांनी वैशाली यांना आवाज दिला, पण त्यांचं लक्ष नसल्यानं आतिष हा वैशाली यांना वाचवायला गेला पण या दोघांनाही रेल्वेनं उडवलं, यात या दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.
