पाकचा 36 चा आकडा असलेल्या देशाशी भारताची हातमिळवणी; सिंधूनंतर आता पुढची स्टेटजी काय?
पाकिस्तानला सर्वच बाजूंनी घेराव घालण्यासाठी भारताने हालचाली सुरू केल्या आहेत. भारताने पहिल्यांदाच अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारशी बोलणी केली आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचा ३६चा आकडा आहे आणि त्यातच आता भारताची तालिबानशी बोलणी सुरू झाली आहे.
भारताने पाकिस्तानला आता अफगाणिस्तानातून घेरण्याची तयारी पूर्ण केली आहे आणि त्यासाठीच भारताने पहिल्यांदाच राजनैत्तिक स्तरावर थेट तालिबानशी बोलणी केली. अफगाणिस्तानमध्ये सध्या तालिबानचे सरकार आहे आणि अफगाणिस्तान पाकिस्तानचा ३६चा आकडा आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री अमीर मुत्ताकी यांच्याशी चर्चा केली.
भारत-पाकिस्तानच्या तणावाच्या दरम्यान भारत पहिल्यांदाच तालिबानशी बोललाय. राजनैत्तिक स्तरावर आतापर्यंत भारताचा तालिबान सरकारशी संपर्क नव्हता. पण पहिल्यांदाच अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकार आल्यावर भारताने राजनैत्तिक स्तरावर संपर्क केलाय. पुलगावमध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर तालिबानने या हल्ल्याची निंदा केली होती. त्यानंतर भारतानेही अफगाणिस्तानच्या या भूमिकेचे स्वागत केलं. आता भारताने तालिबानशी बोलणी का केली? तर त्याचं कारण आहे पाकिस्तानला सर्वच बाजूंनी घेरावं.
भारताने सिंधू जल करार स्थगित करून पाकिस्तानचं पाणी बंद केलं त्यामुळेच पाकिस्तानमध्ये जलसंकट निर्माण होणार आहे. त्यातच आता अफगाणिस्तानमधून पाकिस्तानात जाणारं पाणीही भारत कुटनीतीने थांबवणार आहे. भारत अफगाण सरकारला शहतूत धरण योजनेसाठी मदत करणार आहे. शहतूत धरण अफगाणिस्तानमधल्या काबुल नदीवर बांधलंय. भारत शहतूत योजनेसाठी २३६ मिलियन डॉलरची मदत अफगाणिस्तानला देणार आहे. काबुल नदीवर धरण बांधल्यास या नदीचं पाणी पाकिस्तानमध्ये जाणार नाही. काबुल नदी अफगाणिस्तानातून पाकिस्तानच्या खैबर पख्तूनवा प्रांतामध्ये जाते. त्यामुळे पाकिस्तानची अफगाणिस्तानमधूनसुद्धा जलकोंडी होणार आहे.
