Bhushan Gavai Attack : सरन्यायाधीशावर बूट भिरकावला तरी कारवाई नाही? पोलिसांकडून ‘त्या’ वकिलाची चौकशी अन्…
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका वकिलाने बूट फेकून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सनातन धर्माच्या अपमानावरून हा प्रकार घडला. गवईंच्या सूचनेनंतर वकिलाला सोडून देण्यात आले, मात्र शरद पवारांनी या घटनेचा निषेध करत, न्यायव्यवस्था, लोकशाही आणि संविधानावरील हा हल्ला असल्याचे म्हटले आहे.
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. एका वकिलाने त्यांच्या जवळ जाऊन बूट फेकण्याचा प्रयत्न केला. वकिलाने सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही असे वक्तव्य केल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने वकिलाला ताब्यात घेतले. मात्र, सरन्यायाधीश भूषण गवई यांनी या प्रकरणी कोणतीही कारवाई न करण्याचा निर्णय घेतल्याने, पोलिसांनी वकिलाची चौकशी करून त्याला सोडून दिले. वकिलाचे आधार कार्ड, सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे कार्ड आणि मोबाईल फोन यासह सर्व वस्तू त्याला परत करण्यात आल्या.
या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्वीट करत या हल्ल्याच्या प्रयत्नाचा निषेध केला. पवार म्हणाले की, न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च संस्थेमध्ये मुख्य न्यायमूर्तींवरच अशाप्रकारे हल्ल्याचा प्रयत्न होणे, हा केवळ न्यायव्यवस्थेचाच नव्हे, तर लोकशाहीचा, संविधानाचा आणि देशाचा घोर अवमान आहे. आपल्या देशात पेरले जाणारे विष आता संविधानाच्या सर्वोच्च संस्थांनाही जुमानत नाही, असे म्हणत त्यांनी भारतीय लोकशाहीचे स्तंभ कमकुवत होणार नाहीत यासाठी कायम प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली.
