Chitra Wagh : नरकातला स्वर्ग नाही तर गटारातील… संजय राऊतांच्या पुस्तकावर चित्रा वाघ यांचा जिव्हारी लागणारा निशाणा
नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी पुढे बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचं किती स्मरण ठेवलं, असा सवाल संजय राऊतांनी आपल्या पुस्तकात केला आहे. ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकात नेमकं काय म्हटलंय?
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील नेते संजय राऊत यांची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. त्याचं कारण म्हणजे ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक… संजय राऊत यांनी या पुस्तकात नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन मदत केली, असा गौप्यस्फोट केलाय. तर ईडी कोठडी आणि आर्थर रोड जेलमधील कारावासात असताना आलेल्या अनुभावांबद्दलही संजय राऊत यांनी ‘नरकातला स्वर्ग’या पुस्तकात म्हटलं आहे. संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ शनिवारी पार पडणार असून यावेळी शरद पवार आणि उद्धव ठाकरे काय भूमिका मांडणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मुंबईत पार पडणार असून शरद पवार, उद्धव ठाकरे, जावेद अख्तर, साकेत गोखले यांच्या प्रमुख उपस्थिती असणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी गटारातील अर्क असं नाव लेखकाला शोभलं असतं, असं म्हणत राऊतांना डिवचलं आहे.
