Narayan Rane : ‘…तेव्हा कोकणाला काय दिलं?, जरा आकडेवारी काढा’, एकच सवाल अन् राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतील तेव्हा हॉटेलमध्ये कोंबडी वडे आणि मासे बंद ठेवा, असं आपण हॉटेल व्यवसायिकांना सांगितल्याचं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. बघा काय केला ठाकरेंवर हल्लाबोल?
भाजप नेते नारायण राणे यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार घणाघात केला आहे. ‘मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी कोकणाला काय दिले?’, असा एकच सवाल करत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीकास्त्र डागलं. ‘खालून वरपर्यंत काम करण्यासाठी उद्धव ठाकरे कोकणात येणार आहे ना… अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना मिळालेल्या पैशांची आकडेवारी जरा मागवा, किती पैसे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना सिंधुदुर्गाला दिलेत?’, असा सवाल करत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना कोकणावर बोलण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे म्हटलंय. पुढे नारायण राणे असंही म्हणाले की, उद्धव ठाकरे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येतील तेव्हा हॉटेलमध्ये कोंबडी वडे आणि मासे ठेवू नका. तेवढंच करायला येतात बाकी काही करत नाही, असं म्हणत राणेंनी ठाकरेंवर जिव्हारी लागणारी टीका केली आहे.
