Nagpur Winter Session : आरशात पाहावं… उद्धव ठाकरेंच्या ‘कोण होतास तू काय झालास तू…’ या टीकेला भाजपच्या बड्या नेत्याचं उत्तर
नागपूर हिवाळी अधिवेशनात राजकीय आरोपांचे सत्र सुरू आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंना आरशात पाहा असे म्हणत जोरदार टीका केली. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ठाकरेंच्या अनाकोंडा टीकेला प्रत्युत्तर दिले. मुंबईच्या कथित लुटीवरून शिंदेंनी ठाकरे गटावर निशाणा साधला. दरम्यान, पालिका निवडणुकांवरही महत्त्वाची बैठक पार पडली.
नागपूर हिवाळी अधिवेशनात राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापले आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर तुम्ही आरशात पाहा, कोण होतास तू, काय झालास तू अशा शब्दांत टीका केली. आपल्या नेत्यांवर बोलण्याची उद्धव ठाकरेंची पात्रता नाही, असेही महाजन म्हणाले. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असूनही हिंदुत्वाच्या बाजूने निर्णय देणाऱ्या न्यायाधीशांवर महाभियोग आणण्याच्या प्रयत्नांवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. याचवेळी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या अनाकोंडा टीकेला प्रत्युत्तर दिले. ठाकरे यांनी अमित शहा यांना अनाकोंडा संबोधले होते. यावर शिंदे म्हणाले की, ज्यांनी २५ वर्षे मुंबईला लुटले, मिठीतला गाळही सोडला नाही, त्यांना अमित शहांवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. दरम्यान, नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथील मुले विक्री प्रकरणाचा अहवाल पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आला आहे. तसेच, अमित शहा यांच्या भेटीनंतर रवींद्र चव्हाण यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत पालिका निवडणुका महायुती म्हणून लढण्याबाबत सकारात्मक चर्चा केली.
