Pankaja Munde PA Wife Death : गौरी गर्जे प्रकरणी मोठी अपडेट, पतीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप, अनंत गर्जेसह तिघांविरुद्ध गुन्हा
पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी गर्जे यांच्या आत्महत्येप्रकरणी पती अनंत गर्जे, नणंद शितल गर्जे आणि दीर अजय गर्जे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मारहाण आणि मानसिक त्रासामुळे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. कुटुंबीयांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय व्यक्त केला असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
पंकजा मुंडेंचे स्वीय सहायक (PA) अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी गर्जे यांच्या आत्महत्येमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गौरी गर्जे यांचे पती अनंत गर्जे, त्यांची नणंद शितल गर्जे आणि दीर अजय गर्जे यांच्याविरुद्ध वरळी पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांखाली ही कारवाई करण्यात आली आहे. मारहाण करून मानसिक त्रास दिल्यामुळे गौरी यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. गौरी गर्जे यांच्या आत्महत्येनंतर रात्रीपासून त्यांचे आई-वडील वरळी पोलीस ठाण्यात उपस्थित होते. त्यांनी अनंत गर्जे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
गौरी यांच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या रितसर जबाबामध्ये अनेक महत्त्वपूर्ण खुलासे केले आहेत. त्यानुसार, मागच्या काही दिवसांपासून गौरी गर्जे यांना त्यांच्या सासरच्या मंडळींकडून सातत्याने त्रास दिला जात होता. यामध्ये त्यांच्या नणंद शितल गर्जे आणि दीर अजय गर्जे यांचा समावेश होता. पती अनंत गर्जे यांच्याकडून गौरीला मारहाणही केली जात असे, असे जबाबामध्ये नमूद करण्यात आले आहे.
