50 Khoke Row : आता हे काय…भाजपचाच आमदार म्हणतोय, 50 खोके-ओक्के! फोडाफोडीनंतर युतीतचं भांड्याला भांडं
महायुतीमध्ये खोके वाद पुन्हा चर्चेत आला आहे. भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यावर 50 कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला आहे. बांगर यांनी पूर्वी उद्धव ठाकरेंसाठी रडून शिंदे गटाला शिव्याशाप दिले होते, मात्र नंतर ते शिंदे गटात सामील झाले. यामुळे शिंदे-भाजप युतीत शाब्दिक युद्ध पेटले आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात 50 खोके हा शब्द पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी खुद्द भाजप आमदारानेच मित्रपक्षाच्या आमदारावर हा गंभीर आरोप केल्याने महायुतीमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. हिंगोलीचे भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यावर गंभीर आरोप करत म्हटले आहे की, बांगर यांनी शिंदे गटात सामील होण्यासाठी 50 कोटी रुपये घेतले आहेत. या आरोपामुळे विरोधकांच्या 50 खोके एकदम ओके या दाव्यांना अधिक बळ मिळाले आहे.
विशेष म्हणजे, शिंदे गटात जाण्यापूर्वी संतोष बांगर हे उद्धव ठाकरे यांचे निष्ठावान सैनिक म्हणून ओळखले जात होते. त्यांनी शिंदे गटावर आमदारांना फोडण्यासाठी पैसे वापरल्याचा आरोप करत, उद्धव ठाकरेंसाठी सार्वजनिकरित्या अश्रू ढाळले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी अचानकपणे शिंदे गटात प्रवेश केला. मुटकुळे यांच्या या खळबळजनक आरोपामुळे शिंदे गट आणि भाजप यांच्यातील संबंध ताणले गेले असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. मुटकुळे यांनी या व्यवहारावर अधिक माहिती देण्यास टाळाटाळ केली असली तरी, या आरोपामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवी चर्चा सुरू झाली आहे.