Nitesh Rane : …त्यांच्या तोंडावर चपराक, पुन्हा कुणीही हिंमत करू नये, मालेगाव बॉम्बस्फोट निकाल येताच नितेश राणेंचा घणाघात
आतंकवादाला ताकद देणे आणि जिहादला ताकद देणं हे विरोधकांचे सुरू होतं. ज्यांनी ज्यांनी यांची बदनामी केली, त्यांनी नाक रगडून माफी मागितली पाहिजे, अशी मागणी नितेश राणेंनी केली.
मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या प्रकरणात १७ वर्षांनंतर राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) न्यायालयाने एक धक्कादायक निकाल दिला आहे. सातही आरोपींना पुराव्याच्या अभावामुळे निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. यावर भाजप नेते मंत्री नितेश राणेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मालेगावच्या प्रकरणातून समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न होता, त्यांना तोंडावर चपराक मिळाली आहे. त्यामुळे यापुढे हिंदू समाजाची बदनामी करण्याची हिंमत कुणीही करू नये, असं म्हणत भाजप नेते मंत्री नितेश राणेंनी विरोधकांना थेट इशारा दिला आहे.
इतकंच नाहीतर एकच विषय सिद्ध होतोय की, आतंकवादाचा रंग आणि जिहादचा रंग हा हिरवाच आहे. कॉंग्रेसच्या काळात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर खोट्या केस करण्यात आल्या, त्यांना अडकवण्यात आलं. हिंदुत्ववादी विचारसरणीचे राज्य आणि केंद्र सरकार असताना शक्य नाही. आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आमचा हिंदू सुरक्षेत आहे हे पुन्हा सिद्ध झालंय असं म्हणत टीका करणाऱ्या विरोधकांना नितेश राणेंनी फटकारलंय. विरोधकांच्या टीकेवर बोलताना पुढे राणे असेही म्हणाले की, खरंतर या लोकांनी हिंदू समाजाची माफी मागितली पाहिजे. यांनी मंदिरात जाऊन हिंदू समाजाची माफी मागावी. पुरावे यांच्या विरोधात चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आले. ते कोर्टात कोणतेही पुरावे सिद्ध करू शकले नाहीत.
