Phaltan Doctor Death : त्या पोरीच्या रूममध्ये 82 पोस्टमार्टम रिपोर्टचा गठ्ठा, वर्षभर तिला ती एकच ड्युटी… धसांच्या आरोपानं खळबळ
फलटण येथील महिला डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी सुरेश धस यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. वर्षभर पोस्टमॉर्टमची ड्युटी, ८२ पीएम रिपोर्टचा गठ्ठा आणि पोलीस अधिकारी बदने यांच्याकडून चुकीच्या कामांसाठी होणारा दबाव, यावर धस यांनी बोट ठेवले. तक्रारी करूनही डॉक्टर एकट्या पडल्याचा आरोप त्यांनी केला.
फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणी राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजप नेते सुरेश धस यांनी या घटनेसंदर्भात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या दुःखात सहभागी झाले. डॉ. संपदा मुंडे यांना वर्षभर सातत्याने पोस्टमॉर्टमची ड्युटी का दिली गेली, असा सवाल धस यांनी केला आहे. त्यांच्या राहत्या खोलीत ८२ पोस्टमॉर्टम रिपोर्टचा गठ्ठा आढळल्याचेही त्यांनी सांगितले.
फेब्रुवारी महिन्यापासून डॉ. संपदा मुंडे यांच्यावर प्रचंड दबाव होता. पोलीस अधिकारी बदने हे त्यांना चुकीची कामे करण्यासाठी दबाव टाकत होते, असा आरोप सुरेश धस यांनी केला आहे. डॉ. मुंडे यांनी या दबावाविरोधात पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि डीवायएसपींकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या, परंतु त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही आणि त्या एकट्या पडल्या, असे धस यांनी नमूद केले. या प्रकरणात वरिष्ठ अधिकारी डॉ. धुमाळ यांची भूमिका काय होती, यावरही धस यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या गंभीर आरोपांची सखोल चौकशी होण्याची मागणी जोर धरत आहे.
