Sambhajinagar : ती सोनोग्राफीसाठी विणवण्या करत राहिली, डॉक्टर मात्र ढाराढुर झोपून होते.. | VIDEO
छत्रपती संभाजीनगरमधील जिल्हा सामान्य रुग्णालयात एक धक्कादायक घटना घडली आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील जिल्हा सामान्य रुग्णालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. सोनोग्राफीसाठी आलेल्या एका महिलेला डॉक्टर झोपले असल्याने तासभरापेक्षा जास्त वेळ प्रतीक्षा करावी लागली. कामाच्या वेळेत डॉक्टर टेबलवर डोके ठेवून झोपले होते, आणि याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामुळे आरोग्य सेवांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. ही घटना स्त्रीरोग तज्ज्ञ विभागातील वॉर्ड क्रमांक पाचमध्ये घडली.
या रुग्णालयात एका महिलेला सोनोग्राफी करायची होती, परंतु डॉक्टर झोपले असल्याने तिला तीव्र वेदनांमध्येही ताटकळत उभे राहावे लागले. नर्सने तिला सांगितले की, डॉक्टर संध्याकाळी उठल्यानंतरच सोनोग्राफी होईल आणि तोपर्यंत तिला काही गोळ्या दिल्या. या प्रकाराचा व्हिडीओ एका रुग्णाच्या नातेवाइकाने काढला असून, तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसरला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील जिल्हा सामान्य रुग्णालय हे मराठवाड्यातील गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांसाठी महत्त्वाचे केंद्र आहे. मात्र, उच्च पगार घेणाऱ्या डॉक्टरांकडून असा बेजबाबदारपणा दिसून येत आहे. रुग्णांना तासन्तास वाट पाहावी लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. आम्ही तासभर वाट पाहतो, पण डॉक्टर झोपलेले असतात, मग आम्ही कुठे जायचे? असा प्रश्न रुग्णांचे नातेवाईक विचारत आहेत.
