मुंबईमधील टुरिस्ट ट्रेनचा शुभारंभ; मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा
महाराष्ट्र शासन आणि भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाच्यावतीने आज 'छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वेचा शुभारंभ करण्यात आला.
ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनगौरवाचा अनुभव देण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने एक विशेष पर्यटक ट्रेन ‘छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वेचा शुभारंभ आज केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज सर्किट अंतर्गत भारत गौरव ट्रेनला आज सकाळी ६.३० वा. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, प्लॅटफॉर्म क्रमांक 18, मुंबई येथे हिरवा झेंडा दाखवून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ झाला. ही भारत गौरव टुरिस्ट ट्रेन आज पासून सुरू होत आहे.
दरम्यान, या ५ दिवसांच्या विशेष टूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेट, इतिहासावर आधारीत कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत तरी पर्यटकांनी याचा अनुभव घ्यावा असे आवाहन पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.
