VIDEO | बैलगाडा शर्यत आयोजित केल्यास गुन्हे दाखल होणार, प्रशासनाचा इशारा, आटपाडीतल्या 9 गावांमध्ये संचारबंदी

| Updated on: Aug 17, 2021 | 11:55 PM

न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत नियमबाह्य शर्यतीचे आयोजक, संयोजक, स्पर्धक, बघ्यांवरही गुन्हे दाखल करणार, असे स्पष्ट करत कोणत्याही स्थितीत बैलगाडी शर्यती होवू देणार नाही, असा पवित्रा पोलीस व महसूल प्रशसानाने घेतलाय.

Follow us on

सांगली : बैलगाडा शर्यतीवरुन राज्यात जोरदार राजकारण रंगण्याची शक्यता आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील झरे गावात बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री 12 वाजल्यापासून 20 ऑगस्टच्या रात्रीपर्यंत दोन दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता ही संचारबंदी लागू असणार आहे. (Curfew imposed in 9 villages of Atpadi of Sangli due to bullock cart race)

आमदार गोपीचंद पडळकर कोर्टाची बंदी असतानाही बैलगाडी शर्यतीचे आयोजन केलं आहे. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत नियमबाह्य शर्यतीचे आयोजक, संयोजक, स्पर्धक, बघ्यांवरही गुन्हे दाखल करणार, असे स्पष्ट करत कोणत्याही स्थितीत बैलगाडी शर्यती होवू देणार नाही, असा पवित्रा पोलीस व महसूल प्रशसानाने घेतलाय. प्रांताधिकारी संतोष भोर, डीवायएसपी अश्विनी शेंडगे, तहसीलदार, पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांनी झरे येथील बैलगाडी शर्यतीच्या अनुषंगाने बैठक घेत त्या टाळण्याचा प्रयत्न केला. त्याबाबत आमदार गोपीचंद पडळकर यांनाही बैठकीला निमंत्रीत करण्यात आले होते. आमदार पडळकरांचे प्रतिनिधी बैठकीला हजर होते.

झरे आणि पंचक्रोशीत कलम 144 लागू

गैरपध्दतीने शर्यत आयोजित करणे चुकीचे आहे. प्रशासनाला आव्हान देण्याचे काम या निमित्ताने झाले आहे. झरे आणि पंचक्रोशीत 144 कलमान्वये संचारबंदी, जमावबंदी आदेश लागू करून पोलीस प्रशासन कडक भूमिका घेत आहे. बैलगाडी शर्यत असलेल्या झरे गावात येणं, तेथून बाहेर जाणं, वाहने, बैलगाड्यांची ये-जा, शेजारच्या तालुका आणि जिल्ह्यातील प्रवेशाला मनाई करण्यात आली आहे. त्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

बैलगाडा शर्यत टाळण्यासाठी पोलिसांकडून धरपकड

सांगलीतल्या झरे गावात बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर ही शर्यत होऊ नये यासाठी पोलिसांकडून शेतकऱ्यांची धरपकड सुरु करण्यात आलीय. तीन शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सगळ्या जिल्ह्याच्या सीमा बंद करण्याचे आदेश सांगली पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. इतकंच नाही तर जिल्ह्यातील बैलगाडा मालकांना पोलीस विभागाकडून नोटीसा देण्यात आल्या आहेत.

एकीकडे पोलिसांकडून कारवाई सुरु करण्यात आली आहे. तर दुसरीकडे आमदार गोपीचंद पडळकर यांनीही आक्रमक पवित्रा घेतलाय. मला जेलमध्ये टाकलं तरी बैलगाडा शर्यत होणार. राष्ट्रवादी काँग्रेसचं गृहमंत्रालय बळाचा वापर करत आहे. आमच्या शेतकऱ्यांना ताब्यात घ्यायला सुरुवात झाली आहे. काय कारवाई व्हायची ती होऊ द्या. मी बैलगाडा शर्यत भरवणारच, असा पवित्रा पडळकर यांनी घेतला आहे. त्यामुळे बैलगाडा शर्यतीच्या मुद्द्यावरुन राजकारण तापण्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे.