Rupali Chakankar : हलगर्जीपणा अन् मग्रुरी दाखवली, गर्भवतीच्या मृत्यूस रुग्णालयच दोषी; रूपाली चाकणकरांनी स्पष्टच सांगितलं
Rupali Chakankar Press Conference : पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका गर्भवती महिलेला दाखल करून घेण्यासाठी 2 लाखांची मागणी करण्यात आली. त्यामुळे वेळीच उपचार न मिळाल्याने या महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यावर आज महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेतली.
दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने उपचार देण्यास टाळाटाळ केली. रुग्णालयाने स्वतःला वाचवण्यासाठी जो अहवाल सादर केला आहे, त्यात त्यांनी रुग्णाच्या गोपनीय गोष्टी जाहीर केल्या ते अत्यंत चुकीचे आहे. रुग्णालयाने ज्या गोष्टी समिती समोर मांडायला हव्या होत्या त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडल्या, अशी संतप्त प्रतिक्रिया महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. आज या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये पैशांमुळे योग्य वेळेत उपचार न मिळाल्याने गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी पुण्यातून संताप व्यक्त केला जात आहे. त्यानंतर आता महिला आयोगाने या संपूर्ण प्रकरणाची दाखल घेतली आहे.
पुढे बोलताना चाकणकर म्हणाली की, मंगेशकर रुग्णालयाने धर्मादायाची नियमावली पाळली नाही. हे शासनाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. रुग्णास योग्य उपाचार मिळाले नाही. साडेपाच तास गर्भवती महिला रुग्ण मंगेशकर रुग्णालयात होती. त्यांच्यावर उपचार झाले असते तर त्या वाचल्या असत्या. त्यांच्या मृत्यूला रुग्णालय जबाबदार आहे, असा अहवाल राज्य शासनाच्या समितीचा आहे. आता इतर दोन अहवाल उद्या येतील. त्यानंतर रुग्णालयावर कारवाईचा निर्णय घेण्यात येईल.रुग्णालयाने हलगर्जीपणा अन् मग्रुरीपणा केलेला आहे. त्यामुळे यामध्ये रुग्णालय दोषी असल्याचं रूपाली चाकणकर यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितलं आहे.
