भाजप माजी नगरसेवकाच्या आजी-माजी समर्थकांमध्ये राडा, हातात तलवारी, रॉड अन्… डोंबिवलीत काय घडलं?
भाजपचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे हे कामानिमित्त शनिवारी रात्री एका बिल्डरच्या ऑफिसमध्ये गेले होते. यावेळी त्याठिकाणी मेघराज तुपांगे आले. तुपांगे आणि म्हात्रे यांचे सुरक्षारक्षक यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला.
डोंबिवलीमध्ये शनिवारी दोन गटात हाणामारी झाली. समोर आलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री डोंबिवली पश्चिम भागात राजू नगर परिसरात भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेवकाच्या आजी-माजी समर्थकांमध्ये मोठा राडा झाला. भाजपचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांच्या आजी-माजी समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. तलवारी, लोखंडी रॉड, दगडांनी दोन्ही गटाकडून मारहाण करण्यात आली असून तलवारी-रॉडसह झालेल्या हाणामारीमध्ये पाच जखमी झाले आहे. तर या प्रकरणानंतर विष्णुनगर पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल करत तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी विष्णू नगर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. विधानसभा निवडणुकीत झालेल्या वादाच्या जुन्या रागातून हा राडा झाल्याची माहिती मिळतेय.
Published on: May 05, 2025 09:37 AM
